नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्कार
अभिनेते महेश कोठारे यांना जाहीर
कोल्हापूर/प्रतिनिधी : नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांचे स्मरणार्थ १ मार्च रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ‘नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्कार’ सोहळा साजरा होतो.या पुरस्कारातून जपल्या जाताहेत वडिलांच्या स्मृती.त्यांच्या १११ व्या जयंतीनिमित्त यंदाचा अकरावा कलायात्री पुरस्कार निर्माते,दिग्दर्शक व अभिनेते महेश कोठारे या उमद्या व्यक्तिमत्वाला देण्यात येणार आहे.१ मार्च २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता शाहू स्मारक भवन येथील मुख्य सभागृहात हा सोहळा संपन्न होणार आहे.गेली ३५ वर्षे वेगवेगळ्या सांस्कृतिक उपक्रमाद्वारे जयशंकर दानवे या कलाकाराचे स्मरण दानवे परिवारातर्फे केले जाते.२०११ सालापासून हे कलायात्री पुरस्कार सुरु झाले असून हा पुरस्कार नाटक,चित्रपट,दूरदर्शन या माध्यमावर पकड असणाऱ्या रंगकर्मींना देण्यात येतो.शाल,श्रीफळ,सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.आजपर्यंत श्री.दिलीप प्रभावळकर,डॉ.मोहन आगाशे,सदाशिव अमरापूरकर,शरद पोंक्षे,अरुण नलावडे,सुबोध भावे,प्रशांत दामले,डॉ.गिरीश ओक,भरत जाधव,अविनाश व ऐश्वर्या नारकर या रंगकर्मींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.बालवयापासून हिंदी व मराठी सिनेसृष्टी गाजविणारे अभिनेते आणि धुमधडाका,दे दणादण,थरथराट,झपाटलेला असे अनेक मराठी चित्रपटातील कलाकार,दिग्दर्शक आणि जय मल्हार,विठू माऊली आणि सध्या गाजत असेलली दख्खनचा राजा ज्योतिबा अशा मालिकांचे निर्माते महेश कोठारे यांची कलायात्री पुरस्कारानंतर प्रकट मुलाखत होणार असून मुलाखतकार आहेत कमला कॉलेजचे प्रा.डॉ.सुजय पाटील सर.या मुलाखतीचा आनंद सर्व रसिक प्रेक्षकांनी घ्यावा अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक जयश्री दानवे,राजदर्शन दानवे सुधीर पेटकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.