बाबांनो, अलर्ट राहा आणि मास्क वापराच –
मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन
कागल/प्रतिनिधी : महाराष्ट्रासह देशात कोरोणा पुन्हा वाढत आहे. त्यामुळे बाबानो, अलर्ट राहा आणि मास्क वापराच, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. मासच्च्या वापरासह सनिटायजेशन आणि सोशल डिस्टंसिंग बाबत सरकारी यंत्रणांनी ही कडक अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिल्या.येथील डी आर माने महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कोरोना आढावा बैठकीत मंत्री श्री मुश्रीफ बोलत होते. बैठकीला तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, कागल ग्रामीण रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. सुनिता पाटील, कागलचे मुख्याधिकारी पंडित पाटील, मुरगूडचे मुख्याधिकारी संजय गायकवाड, कागल कोविड केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित शिंदे, कागलचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, मुरगूड चे पोलीस उपनिरीक्षक विकास बडवे आदी अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, कोरोना लसीकरणाचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत, हे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे फ्रन्टलाइनवर काम केलेल्या कोरोना योध्द्यानी तातडीने लसीकरण करून घ्या. ते पूर्ण झाल्यानंतर मगच पन्नास वर्षावरील नागरिकांना लस मिळणे सोपे होईल . राज्याच्या तुलनेत या घडीला जरी कागल तालुक्यात रुग्णसंख्या कमी असली तरी कोविड केअर सेंटर, औषध पुरवठा व अनुषंगिक यंत्रसामुग्री सज्ज ठेवा, अशा सूचनाही श्री मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यात्रा, जत्रा, उत्सव आणि धार्मिक कार्यक्रम शासनाच्या सूचनेनुसार मर्यादित लोकांच्या उपस्थितीतच करा, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.
यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, उपनगराध्यक्ष बाबासाहेब नाईक, माजी उपनगराध्यक्ष सौरभ पाटील, नगरपालिकेचे पक्षप्रतोद नितीन दिंडे, माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर, नगरसेवक विवेक लोटे, गंगाराम शेवडे आदी प्रमुख उपस्थित होते.
चौकट…..
मास्क हेच प्रभावी हत्यार…….
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, कोरोना संपत चाललाय असे वाटत असतानाच बाधितांची संख्या पुन्हा नव्या जोराने वाढतच आहे. दोन हजारांवर असलेली रुग्ण संख्या आठ हजारांवर पोहोचल्याकडे लक्ष वेधताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, या परिस्थितीत मास्क हेच प्रभावी हत्यार आहे. सुरक्षित जगण्यासाठी मास्क वापरा!