शिवाजी विद्यापीठाचा ‘रवळनाथ’समवेत सामंजस्य करार
अर्थसाक्षरता प्रसाराला गती अपेक्षित: कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के
कोल्हापूर/प्रतिनिधी : सहकारी क्षेत्रातील बहुराज्य संस्था असलेल्या श्री रवळनाथ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीसमवेत शिवाजी विद्यापीठाने केलेल्या सामंजस्य करारामुळे अर्थसाक्षरता प्रसार, प्रशिक्षण व संशोधन कार्याला गती येईल, अशी अपेक्षा कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे व्यक्त केली.आजरा येथील मल्टिस्टेट संस्था श्री रवळनाथ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटी आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या दरम्यान आज व्यवस्थापन परिषद सभागृहात सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, ‘रवळनाथ’चे संस्थापक व अध्यक्ष एम.एल. चौगुले प्रमुख उपस्थित होते. कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रामध्ये अर्थसाक्षरता प्रसाराची मोठी गरज आहे. विद्यार्थी, संशोधकांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांमध्येही या संदर्भातील जाणीवजागृती आवश्यक आहे. त्या दृष्टीने ‘रवळनाथ’च्या सहकार्याने राज्यस्तरीय, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय परिषदा, कार्यशाळा व चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येईल, ज्याचा सर्वच घटकांना लाभ होईल. सहकार, वाणिज्य व व्यवस्थापन तसेच अर्थशास्त्र आदी क्षेत्रांतील संयुक्त संशोधन प्रकल्प, अभ्यास हाती घेण्यात याव्यात, जेणे करून अधिकाधिक समाजाभिमुख काम या सामंजस्य कराराच्या माध्यमातून साकार व्हावे.
दिल्ली येथील राष्ट्रीय सहकार संघामार्फत‘रवळनाथ’ला सभासद प्रशिक्षणासाठी तीन लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाल्याबद्दल कुलगुरूंनी संस्थेचे अभिनंदनही केले.
यावेळी श्री. एम.एल. चौगुले म्हणाले, अर्थ, सहकार व वाणिज्य आदी क्षेत्रांमध्ये अनेक नवनवीन प्रवाह निर्माण होत आहेत. अनेक संधी आणि आव्हानेही सामोरी येताहेत. या सर्वांचा उहापोह करणे आणि सहकार क्षेत्रात कार्यरत संचालक व सदस्यांना त्याविषयी अवगत करणे या बाबींची नितांत गरज निर्माण झाली आहे. त्या दृष्टीने प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याच्या दृष्टीने हा करार उपयुक्त ठरणार आहे.सामंजस्य करारावर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि एम.एल. चौगुले यांनी स्वाक्षरी केल्या. या प्रसंगी श्री. चौगुले यांनी‘रवळनाथ’च्या वतीने गरजू विद्यार्थ्यांसाठी म्हणून एक लाख रुपयांचा निधी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्याकडे सुपूर्द केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एम.एस. देशमुख यांनी केले. कुलसचिव डॉ. नांदवडेकर यांनी आभार मानले. यावेळी डॉ. विजय ककडे, प्रा. विजय आरबोळे, प्रा. मीना टिंगणे, रेखा पोतदार, विद्यापीठाचे माजी वित्त व लेखाधिकारी जी.के. नाईक, विजयकुमार हरगुडे यांच्यासह अर्थशास्त्र अधिविभागातील शिक्षक उपस्थित होते.