अभियांत्रिकी महाविद्यालय ग्रामीण समाज उन्नतीचे माध्यम बनावे : डॉ. अजित पाटणकर
कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतातील गुणवत्तापूर्ण अभियांत्रिकी महाविद्यालये ही सर्वसामान्य माणसाच्या व एकूण ग्रामीण समाज उन्नतीचे माध्यम बनावे असे मत राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाचे (महाराष्ट्र सरकार) तसेच भारताचे अणुउर्जा विभागाचे सल्लागार व भाभा अणुसंशोधन केंद्रातील तंत्रज्ञान विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. अजित पाटणकर यांनी व्यक्त केले. कोल्हापूर इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजीचे अभियांत्रिकी महाविद्यालय (स्वायत्त), कोल्हापूर महाविद्यालयात संशोधन आणि विकास विभाग (आर ऍण्ड डी) आयोजित संवादपर कार्यक्रमात ते बोलत होते.
महाविद्यालयाच्या विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध नवनवीन सरकारी संशोधन योजना व संशोधन निधी, संशोधन विकास याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी केआयटीमध्ये मा. पाटणकर यांना निमंत्रीत करण्यात आले होते. केआयटी विद्याथ्र्यांच्या नवनवीन कल्पना समाजासाठी उपयुक्त ठराव्या या हेतुने काईट व आगामी आयडिया लॅब या माध्यमातून प्रयत्न करत आहे. यावेळी त्यांनी केआयटीच्या शैक्षणिक वाटचालीचे कौतुक केले तसेच केआयटीचे उद्योग क्षेत्राशी असलेले दृढ संबंध, सामंजस्य करार याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. तसेच केआयटीच्या विद्याथ्र्यांच्या व प्राध्यापकांच्या संशोधनाचा उपयोग समाजासाठी व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी केआयटीचे संचालक डॉ.विलास कार्जिन्नी यांनी केआयटीतील विविध उपक्रमांची माहिती दिली. केआयटीचे उपाध्यक्ष श्री. सुनिल कुलकर्णी व सचिव श्री. दिपक चौगुले यांनी केआयटीची भविष्यातील उद्दिष्टे स्पष्ट केली. संशोधन व विकास अधिष्ठाता डॉ. एस.एम.पिसे यांनी केआयटीचे संशोधन क्षेत्रातील योगदान सांगून प्रस्तावित आयडिया लॅबची माहिती दिली. यावेळी डॉ. अमित सरकार यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली व उपाध्यक्ष सुनिल कुलकर्णी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. डॉ. मनोज मुजूमदार यांनी पाहुण्यांचे आभार मानले तसेच प्रा. प्रमोद पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी अधिष्ठाता, प्राध्यापक व विभागप्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी केआयटीचे अध्यक्ष श्री. भरत पाटील, उपाध्यक्ष श्री. सुनिल कुलकर्णी, सचिव श्री. दिपक चौगुले व सर्व विश्वस्त यांचे मार्गदर्शन लाभले.