केआयटीच्या सुमित जोशीची वायुदलात फ्लाईंग ऑफिसरपदी निवड
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजीच्या अभियांत्रिकी महाविद्यालय (स्वायत्त), कोल्हापूर येथील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागाचा विद्यार्थी श्री. सुमित मिलिंद जोशी याची भारतीय वायुदलात फ्लाइंग ऑफिसर या पदी नुकतीच निवड झाली. सुमित जोशी हा केआयटीच्या २०१८ च्या बॅचचा उत्तीर्ण विद्यार्थी आहे. सुमित जोशी यांनी वायुदलामध्ये अधिकारी होण्यासाठी आवश्यक अशी ऍफकॅट या सामाईक परीक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादित केले आहे. देशभरातून ३ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी ही सामाईक परीक्षा दिली होती. त्यातून केवळ ३०० विद्यार्थ्यांना पुढील निवड टप्याकरिता एसएसबी मुलाखतीसाठी आमंत्रित केले होते. त्यातून ९७ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली.
या सर्व स्तरामध्ये सुमित जोशी याने उज्वल यश संपादित केले. नुकतेच सुमितने भारतीय वायुदल अकादमी, हैदराबाद येथे एक वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केले असून त्याची वायुदलात फ्लाईंग ऑफिसर या पदावर नियुक्ती झाली. सुमितचे माध्यमिक शिक्षण कोल्हापूर पब्लिक स्कूल येथे तर उच्च माध्यमिक शिक्षक डिफेन्स सर्व्हिसेस प्रीपेरेटरी इन्स्टिटयुट औरंगाबाद येथे झाले आहे. सुमितच्या या यशामध्ये त्याचे वडील डॉ. मिलिंद जोशी व आई यांचा सिंहाचा वाटा आहे.
सुमितने संपादित केलेल्या या यशाबद्दल केआयटीचे अध्यक्ष श्री. भरत पाटील, उपाध्यक्ष श्री. सुनिल कुलकर्णी, सचिव श्री. दिपक चौगुले, संचालक डॉ. विलास कार्जिन्नी, सर्व संचालक विश्वस्त, मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ. उदय भापकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.