जिल्ह्यातील दहा मतदार संघात आजपासून गृहमतदानाला सुरुवात
पहिल्या दिवशी २५५९ दिव्यांग आणि जेष्ठ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
कोल्हापूर/ (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या गृहमतदानाला आज सुरुवात झाली. गृहमतदानाच्या पहिल्या दिवशी २५५९ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. भारत निवडणूक आयोगाने ८५ वर्षांपुढील व दिव्यांग मतदार जे मतदान केंद्रापर्यंत जाऊ शकणार नाहीत. त्यांच्यासाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदार संघातील ८५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे, दिव्यांग मतदारांची नोंद करून अर्ज भरून घेतले आहेत. यापैकी मतदान केंद्रात जावून मतदान करणे शक्य नसलेल्या मतदारांची संख्या ४ हजार ६०१ एवढी आहे. यात ८५ वर्षावरील ३ हजार ८७० मतदार असून ७३१ दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. या सर्व गृहमतदारांच्या मतदानाला आज सुरुवात झाली. आज झालेल्या मतदानात ३८३ दिव्यांग , २१६८ जेष्ठ आणि ८ कोविड रुग्णांचा समावेश होता.
गृह मतदानासाठी जिल्ह्रयातील दहा मतदार संघात सर्व दिव्यांग व वृद्ध मतदारांच्या घरी जावून विधानसभा मतदार संघनिहाय दि.१६ नोव्हेंबर पर्यंत मतदान घेतले जाणार आहे. त्यासाठी २०९ पथके तयार करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघातील ज्या ८५ वर्षावरील व दिव्यांग मतदारांनी गृह मतदानासाठी नोंद केली आहे त्यांनी याची नोंद घेऊन आपला मतदानाचा पवित्र हक्क बजवावा व लोकशाही बळकट करण्यासाठी आपला हातभार लावावा,असे आवाहनही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.