मतदाना दिवशी कामगारांना भरपगारी सुट्टी
कोल्हापूर(जिमाका): विधानसभा निवडणुकीसाठी दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. या दिवशी व्यवसाय, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर कोणतीही आस्थापना, कंपन्या, संस्थामधील काम करणारे सर्व कामगार, कर्मचारी, अधिकारी यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक आहे. ज्या आस्थापनांना अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत आस्थापनांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. याबाबत आस्थापनांनी जिल्हाधिकारी यांना लेखी अर्ज करुन सवलत प्राप्त करुन घ्यावी, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके यांनी केले आहे.
शासनाने परिपत्रक प्रसारित केले असून त्यानुसार लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५१ मधील कलम १३५ (ब) तरतुदीनुसार आदेश देण्यात आले आहेत. मतदाना दिवशी मतदानासाठी भरपगारी सुट्टी दिली नसल्यास तक्रारीसाठी स्वतंत्र दक्षता कक्ष स्थापन केला असून कामगार आपली तक्रार सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, ५७९, ई वॉर्ड, शाहूपूरी , व्यापारीपेठ, कोल्हापूर येथे व aclkolhapur@gmail.com या ईमेल वर अथवा पुढील मोबाईल क्रमांकाच्या व्हॉट्स ॲपवर ९१४६४७५०५० सर्व माहितीनिशी दाखल करु शकतात.