कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुरातील ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरुवारी रात्री भीषण आग लागली. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत. खासबाग मैदान कडील बाजूस ही आग लागली आहे.या नाट्यगृहात लाकूड समान व अन्य विद्युत सामान होते.त्यामुळेच या आगीने जास्त पेट घेतल्याने आग नाट्यगृहात गेली.
दरम्यान सर्व नाट्यगृहातून आगीचे लोट बाहेर पडत आहेत. उद्या, शुक्रवारी ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या संगीतसूर्य नटसम्राट केशवराव भोसले यांच्या १३४ व्या जयंती दिनाच्या पूर्वसंध्येलाच ही घटना घडली आहे.त्यामुळे कोल्हापूरचे वैभव असणारे हे नाट्यगृह आगीच्या भक्षस्थानी गेले आहे.
अग्नीशमन दलाच्या आठ ते नऊ गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या होते. याबरोबरच कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे घटनास्थळी उपस्थित झाले होते.उद्या ९ रोजी शासकीय कार्यक्रम याठिकाणी होणार होता.मात्र तत्पूर्वीच ही घटना घडली आहे.
या आगीवर नियंत्रण आणण्याचे काम संरक्षण दलाकडून करण्यात येत आहे. आगीने एवढे रुद्ररुप धारण केले आहे. त्यामुळे सभागृहाचा फक्त सांगडाच राहिला आहे. या सभागृहासोबत जिल्ह्यातील तसेच राज्यातील अनेक कलाकारांचे जवळचे नाते आहे.
या लागलेल्या भीषण आगीमध्ये कोणत्याही प्रकारे जीवित हाणी झालेले नाही. परंतु केशवराव भोसले नाट्यगृहाचा काही भाग कोसळत असून छत कोसळलेले आहे. केशवराव भोसले नाट्यगृहात बहुतांश भाग हा लाकडाचा असल्यामुळे आग वाढतच आहे. तसेच आगीवर आटकाव करण्यात सुरक्षा दलाचा कस लागत आहे.