कोल्हापूर आंबा महोत्सवामध्ये ग्राहकांच्या गर्दीत उत्पादक ते ग्राहक थेट आंबा विक्रीला सुरूवात
कोल्हापूरकरांना अस्सल, नैसर्गिकरित्या पिकविलेला हापूस आंबा २३ मे पर्यंत मिळणार
कोल्हापूर, दि.१९ /प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, विभागीय कार्यालय, कोल्हापूर यांच्या मार्फत १९ ते २३ मे दरम्यान कोल्हापूर आंबा महोत्सव २०२४ चे ‘भारत हौसिंग सोसायटी हॉल, राजारामपुरी, कोल्हापूर’ येथे आयोजन करण्यात आलेले आहे. कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम व सरव्यवस्थापक विनायक कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात विविध शहरांमध्ये आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. कोल्हापूरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, रायगड या जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी या महोत्सवात ३२ स्टॉल मांडले आहेत. याशिवाय प्रदर्शनात महाराष्ट्रात उत्पादित होणाऱ्या आंब्याच्या ४७ जातींचे प्रदर्शन मांडले आहे. या आंबा महोत्सवाचे उद्घाटन ग्राहकांच्या प्रचंड गर्दीत पहिल्या दिवशी संपन्न झाले. उत्पादक शेतकरी भारत सलगर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांच्या हस्ते फीत कापून महोत्सवाचे उद्घाटन झाले.तर लीड बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक सचिन कांबळे, कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले, वारके आण्णा, बबनराव रानगे यावेळी उपस्थित होते. महोत्सवाची वेळ चार दिवस सकाळी ९ ते रात्री ९ असणार आहे.
पणन मंडळाकडून राज्यात विविध ठिकाणी आंबा महोत्सव आयोजित करण्यात येतो, आता कोल्हापुरकरांना सुद्धा हापूसचा आनंद चार दिवस घेता येणार आहे. कोल्हापुरातील नागरिकांना थेट उत्पादक शेतकऱ्यांकडून आंबा खरेदी करता येणार आहे. आंबा महोत्सवामध्ये प्रति डझन ३०० ते ७०० रुपये दराने आंबा उपलब्ध आहेत. विक्रीसाठी हापूस व केशर आंबे उपलब्ध आहेत. शिवाय महाराष्ट्रातील विविध जातींच्या आंब्यांचा आस्वाद घेण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत दरवर्षी ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ योजने अंतर्गत विविध फळ महोत्सवांचे आयोजन करण्यात येत असते. विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थांची संख्या कमी करून, शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा शेतमाल मिळावा हा या महोत्सवांचा प्रमुख उद्देश असतो. महोत्सवामध्ये रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, पायरी केसर व इतर विविध जातीचे आंबा उत्पादक शेतकरी वेगवेगळ्या जिल्ह्यातून सहभागी झाले आहेत. ग्राहकांना भौगोलिक मानांकन प्राप्त कोकणातील अस्सल हापूस आंबा उत्पादकांकडून आंबा उपलब्ध होणार आहे. उपस्थित स्टॉलधारक शेतकऱ्यांच्या आंब्यांची नोंद पणन विभागाकडे झाल्याने त्यांच्याकडील उत्पादन चांगल्या प्रतीचे असल्याचे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी सांगितले.
नागरिकांसाठी आंब्याचे ४७ प्रकार प्रदर्शनीतून भेटीला
महोत्सवामध्ये महाराष्ट्रात आढळणाऱ्या आंब्याच्या ४७ जातींचे वेगळे दालन तयार करण्यात आलेले असून, यामध्ये हापूस, करूठा, कोलंबन, बैगनपल्ली, पायरी पंचदराकलशा, हिमायुददीन, राजुमन, वातगंगा, रत्ना, कोकण रुची, करुकम, काळा करेल, चेरूका रासम, विलाय कोलंबन, रानू कल्लू, जहांगीर, नाजूक पसंद, कोंडूर गोवा, तोतापुरी, छोटा जहांगीर, केसर, माया, कुलास, याकुती, कोरन, पदेरी, बनेशान, वनराज, पेढरबाम, दूधपेढा, बंगाली पायरी, निलम, मोहनभोग या जातींच्या आंब्याचा समावेश आहे. येथील आंबा महोत्सव मध्ये ग्राहकांना आंब्याच्या विविध जाती माहीत होण्यासाठी राज्यातील आंब्याचे प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. नागरिकांनी या महोत्सवाला उपस्थित राहून चांगल्या प्रतीचे आंबे खरेदी करावेत त्याचबरोबर प्रदर्शनाला भेट देवून नवी माहिती अवगत करावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी केले आहे. अगदी काही ग्राम पासून दोन ते तीन किलो वजनाचे ४७ आंब्यांचे प्रकार या ठिकाणी पाहण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. ग्राहकांना आंब्याच्या या सर्व जाती प्रदर्शनामध्ये पहावयास मिळत आहेत. यामध्ये दीड किलो वजनाचा वनराज हा आंबा आकर्षण ठरला आहे.