वन्यजीव विभागामार्फत राधानगरी अभयारण्यामध्ये प्राणीगणनेचा कार्यक्रम संपन्न
कोल्हापूर/ (जिमाका) दि .२४ मे २०२४ : वन्यजीव विभागामार्फत दरवर्षी मे महिन्यामध्ये बुध्द पौणिमेदिवशी रात्री चंद्राच्या लख्ख प्रकाशामध्ये राधानगरी अभयारण्यामध्ये प्राणीगणनेचा कार्यक्रम केला जातो. प्राणी गणनेमध्ये निसर्गप्रेमींना १ दिवस जंगलात राहण्याचा तसेच प्राण्याचे दर्शन, आवाज, वनसंपदा व जैवविविधतेचा अनुभव मिळतो. यावर्षी देखील कोल्हापूर वन्यजीव विभागा मार्फत दि. २२ मे रोजी बुध्द पौर्णिमानिमित्त प्राणी गणना आयोजित करण्यात आली होती अशी माहिती विभागीय वन अधिकारी एस. एस. पवार यांनी दिली.
प्राणी गणना राधानगरी अभयारण्य जंगलातील विविध ठिकाणी एकूण २६ पाणस्थळावर घेण्यात आली. या कार्यक्रमात एकूण ५० वनविभागाचे अधिकारी व वनकर्मचारी व २६ प्रगणकांनी (स्वयंसेवक) सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडलेला आहे.दरवर्षी प्राणीगणनेस उदंड प्रतिसाद मिळत आहे. जनसामान्यांना वन्यप्राणी व जंगलामध्ये वनविभागामार्फत करण्यात येत असलेली कामे, वनसंपदा टिकविण्यासाठी वनविभागाकडून करण्यात येत असलेले प्रयत्न याची जवळून माहिती होते. त्यांच्याकरीता हा १ दिवसाचा अनुभव कायम स्मरणात राहणारा असतो.