संतोष शिंदेंच्या आई व बहिणीचा हंबरडा ऐकून आमदार हसन मुश्रीफ निशब्द झाले
नातलगांचा आक्रोश काळीज हृदय हेलावणारा
गडहिंग्लज/प्रतिनिधी : गडहिंग्लज येथील युवा उद्योजक संतोष शिंदे यांनी दोनच दिवसापूर्वी पत्नी व मुलासह आत्महत्या केली. कै. संतोष शिंदे यांच्या घरी आमदार श्री. मुश्रीफ यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी भेट दिली. कै. संतोष शिंदे यांच्या आई श्रीमती सुमित्रा शिंदे, बहीण सौ. प्रतिभा मांडेकर आणि नातलग आणि हंबरडाच फोडला. यावेळी आमदार श्री. मुश्रीफ निशब्द झाले. शिंदे कुटुंबीयांसह नातलगांचा आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता.
आमदार श्री. मुश्रीफ कै. संतोष शिंदे यांच्या घरी आल्याचे समजताच शहरातील प्रमुख नागरिक व विविध संघटनांच्या प्रमुखांनी गांधीनगरमधील श्री. शिंदे यांच्या घराकडे धाव घेतली. त्याचवेळी पोलीस निरीक्षक श्री. सरगरही पोहोचले.श्री. शिंदे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्यासाठी रचलेल्या कटामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व आरोपींना जास्तीत- जास्त शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी उपस्थितानी केली. आमदार श्री. मुश्रीफ यांनी, या गुन्ह्यातील आरोपींना तातडीने अटक करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक श्री. सरगर यांना दिल्या. जोपर्यंत या गुन्ह्यातील आरोपी अटक होत नाहीत, तोपर्यंत शहर अस्वस्थच राहील, असेही ते म्हणाले. यावेळी सर्वपक्षीय शिष्टमंडळ पालकमंत्री श्री. दीपक केसरकर यांना भेटणार आहेत त्यांची भेट घालून द्या, अशी मागणी उपस्थीतानी केली. आमदार श्री. मुश्रीफ यांनी पालकमंत्री श्री. केसरकर यांना फोन करून उद्या सोमवार दि. २६ सकाळी साडेदहाची वेळ निश्चित केली. आमदार श्री. मुश्रीफ यांच्या उपस्थितीत हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहावर पालकमंत्री श्री. केसरकर यांची भेट घेणार आहे.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष किरणअण्णा कदम, माजी उपनगराध्यक्ष महेश उर्फ बंटी कोरी, काँग्रेसचे शहराध्यक्ष बसवराज आजरी, भाजपचे पदाधिकारी चंद्रकांत सावंत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीशराव पाटील- गिजवणेकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने, जनता दलाचे नितीन देसाई व संजीव रोटे, दीपक कुराडे, प्रकाशभाई पताडे, गुंडेराव पाटील, महेश सलवादे, राजू जमादार, राहुल शिरकोळे आदी प्रमुखांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार श्री. मुश्रीफ घरी पोहोचतात संतोष शिंदे यांच्या आई श्रीमती सुमित्रा यांनी हंबरडा फोडला त्या रडतच सांगत होत्या, “माझं पोरगं सरळ आणि प्रामाणिक होतं. कष्टातून उभं राहिलेल आमचं कुटुंब आहे. माझ्या चिमुकल्या नातवानं काय गुन्हा केला होता, असे म्हणताच आमदार श्री. मुश्रीफ यांच्या डोळ्यात आश्रू आले.गडहिंग्लज शहरातील युवा उद्योजक श्री. संतोष शिंदे यांच्यासह पत्नी व मुलगा यांनी एकत्रित आत्महत्या केली. आमदार हसन मुश्रीफ यांनी गांधीनगरमधील त्यांच्या घरी भेटून कुटुंबीयांचे सांत्वन केले. शिंदे यांच्या आई श्रीमती सुमित्रा, बहिण सौ. प्रतिभा यांनी फोडलेला हंबरडा हृदय हेलावणारा होता.