राज्य शासनाचे अध्यादेश असतानाही वर्क ऑर्डर न दिल्याने सीपीआर मधील स्वच्छतेचे काम बंद
कोल्हापूर/प्रतिनिधी : छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय व राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथील स्वच्छता सेवेच्या निविदेला राज्य शासनाने १८ मे रोजी अध्यादेश काढून मंजुरी दिली आहे असे असतानाही सीपीआर प्रशासनाने या कामाची वर्क ऑर्डर न दिल्याने शनिवार दिनांक २४ जून पासून स्वच्छता कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवले आहे.सीपीआर मधील स्वच्छता सेवेच्या कामाच्या निवेदीची मुदत संपल्याने सीपीआर प्रशासनाने नवीन ई-निविदा प्रक्रिया राबवली होती. निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर ती मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवली होती. राज्य शासनाने १८ मे २०२३ रोजी अध्यादेश काढून या निविदा प्रक्रियेला मंजुरी दिली आहे.
राज्य शासनाची निविदेला मंजुरी आल्यानंतर डीएम इंटरप्राईजेस कंपनीच्या वतीने स्वच्छता कामाचा ठेका नियमितपणे सुरळीत ठेवण्यात आला आहे. परंतु १८ मे २०२३ पासून आज अखेर सीपीआर प्रशासनाने सदरच्या कामाची वर्क ऑर्डर न दिल्याने कर्मचाऱ्यांचा पगार करणे अवघड झाले आहे. सीपीआर प्रशासनाकडे सदर कामाच्या वर्कऑर्डरची वारंवार लेखी व तोंडी मागणी करूनही वर्क ऑर्डर देण्यास टाळाटाळ करत सीपीआर प्रशासनाने राज्य शासनाच्या अध्यादेशाचा अवमान केला आहे.
राज्य शासनाने स्वच्छता सेवेची निविदा चालू दराने मंजूर केल्याने त्याचा फायदा स्वच्छता कर्मचाऱ्यांना होणार आहे या निविदेची वर्क ऑर्डर मिळाल्यास स्वच्छता कर्मचाऱ्यांनी चालू वर्षाच्या किमान वेतन दरानुसार पगार मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. परंतु सीपीआर प्रशासनाने वर्क ऑर्डरच न दिल्याने कामगारांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या सीपीआरमधील कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी शनिवारी सकाळपासून काम बंद ठेवले आहे.सीपीआर प्रशासन जोपर्यंत कामाची वर्क ऑर्डर देत नाही तोपर्यंत काम सुरू न करण्याचा निर्णय सिपीआर कंत्राटी स्वच्छता कर्मचारी सेनेने घेतला आहे. कर्मचारी सेनेचे १८० हून अधिक सभासद या काम बंद आंदोलनात सहभागी झाल्याने सीपीआर मधील स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे.