फलटण- वाठारच्या नाईक निंबाळकर घराण्याचा इतिहास, परंपरा आणि स्वाद या पुस्तकाची सौ. अरूंधती महाडिक यांच्याकडून निर्मिती

फलटण- वाठारच्या नाईक निंबाळकर घराण्याचा इतिहास, परंपरा आणि स्वाद या पुस्तकाची सौ. अरूंधती महाडिक यांच्याकडून निर्मिती, शाही पाककलांच्या माहितीसह इतिहासाला उजाळा

कोल्हापूर/प्रतिनिधी : भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून, मराठी पुस्तक विश्वात नवी भर पडली आहे. सौ. महाडिक यांचे माहेर असलेल्या फलटण- वाठारच्या नाईक निंबाळकर घराण्याचा इतिहास, परंपरा आणि स्वाद… या नावाचे एक सुंदर आणि माहितीपूर्ण पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात सौ अरुंधती महाडिक यांच्या घरातील एकत्र कुटुंब पद्धती, शिस्त – संस्कृती- माणुसकी आणि एकोपा यांची शिकवण तर आहेच. शिवाय त्याचवेळी नाईक निंबाळकर घराण्यातील ऐतिहासिक आणि खानदानी पाककलांना उजाळा मिळाला आहे. नाईक निंबाळकर घराण्यातील शाही पाककलेची सविस्तर माहिती देऊन, विविध शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थ कसे बनवले जातात, याबद्दल तपशीलवार साहित्य आणि कृतीसह या पुस्तकात लिखाण केले आहे. त्यामुळे अस्सल दर्दी खवय्ये आणि पाककला प्रेमींना हे पुस्तक नक्कीच आवडेल. सौ. अरुंधती महाडिक यांचे वडील हैबतराव नाईक-निंबाळकर आणि आई सौ. विजयश्री नाईक-निंबाळकर यांच्यासह, संपूर्ण नाईक-निंबाळकर परिवार, त्यावेळची जीवन पद्धती, वाठार मधील त्यांचे भव्य वाडे, नाईक-निंबाळकर घराण्यातील कर्तुत्ववान पुरुष आणि अभिमानास्पद घटना, तत्कालीन मराठा साम्राज्यामध्ये वाठारच्या नाईक-निंबाळकर घराण्याचे आणि परिवाराचे योगदान, अशा अनेक विषयांची या पुस्तकात खुमासदार मांडणी करण्यात आली आहे. त्यामुळे हे पुस्तक म्हणजे केवळ ऐतिहासिक दस्तावेज न राहता, इतिहासकालीन सत्यतेची मांडणी करत वाचकांना गुंग करते. सौ. अरुंधती महाडिक यांच्या मातोश्री सौ. विजयश्री नाईक-निंबाळकर यांच्यासह, त्यांच्या घराण्यातील काकी, आजी, बहिणी, भावजय आणि नव्या पिढीतील सुनां आणि नातवंडांपर्यंतचा वंशवेल आणि नाईक-निंबाळकर घराण्याची पिढ्यान पिढ्यांची पारंपारिक खाद्य संस्कृती, या पुस्तकातून उलगडली आहे. फलटण वाठारच्या नाईक-निंबाळकर घराण्यातील १६ व्या शतकापासूनच्या अनेक पिढ्यांनी पारंपारिक महाराष्ट्रीय जेवणाचा थाट आणि संस्कृती जपली आहे. काळाच्या ओघात अनेक पदार्थ लुप्त पावत आहेत. अशावेळी या पुस्तकामुळे, चवीचा हा अनमोल ठेवा नव्या पिढीतील अन्नपूर्णा गृहिणींना समजणार आहे. सौ. अरुंधती महाडिक जेव्हा माहेरी जायच्या, त्यावेळी त्यांच्या आई आणि कुटुंबातील अन्य महिलांशी स्वयंपाकाबद्दल चर्चा व्हायची. अत्यंत स्वादिष्ट आणि शाही पदार्थ घरी कसे बनवले जातात, त्यात कोणते घटक असतात, याबद्दल गप्पागोष्टी व्हायच्या. पाककलेचा हा इतिहास आणि वैशिष्ट्यं जतन व्हावीत, नव्या पिढीला हे चविष्ट पदार्थ बनवण्याची माहिती आणि प्रेरणा मिळावी, यासाठी हे रेसिपी बुक बनवण्याची सुरुवातीची भावना होती. त्यासाठी सौ. अरुंधती महाडिक यांनी आपल्या माहेरच्या परिवारातील सर्व ज्येष्ठ महिलांची संपर्क साधून, पाठपुरावा करून, प्रत्येक पाककृतीची माहिती संकलित केली आणि हे सर्व शाही आणि तृप्त करणार्या पदार्थांचे उत्तम छायाचित्रांसह रेसिपी सांगणारे पुस्तक आकारास आले.
असे म्हणतात, की नात्यांचा आणि स्नेहाचा मार्ग पोटातून जातो. उत्तम खाद्यपदार्थ बनवणे, ही सर्वोत्तम कला आहे. अशावेळी सौ. अरुंधती महाडिक यांनी पुढाकार घेऊन, वाठारच्या नाईक-निंबाळकर घराण्याची पाककलेची परंपरा, महाराष्ट्राची खाद्य संस्कृती, स्वयंपाकातील बारकावे आणि त्याचवेळी नाईक-निंबाळकर घराण्याचा संपूर्ण इतिहास एका जबाबदारीच्या भावनेतून पुस्तक रुपात आणला आहे. या पुस्तकासाठी इतिहास लेखन, कोल्हापूरचे सुपुत्र आणि शिवशाहीर डॉक्टर पुरुषोत्तम तथा राजू राऊत यांनी केले आहे. तर इतिहास अभ्यासक डॉक्टर अमर अडके यांनीही वाठारकर नाईक-निंबाळकर घराण्याचे इतिहासातील महत्त्व आणि वाठार गावाचे भौगोलिक स्थान महात्म्य, याबद्दल लेखन केले आहे. तर राज्यसभेचे खासदार श्री धनंजय महाडिक यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. कोल्हापुरातील सुचित्र ऍडवर्टाइजिंगचे विशाल कुमठेकर यांनी या पुस्तकाची रचना, सजावट आणि छायाचित्रणाची जबाबदारी यशस्वीरित्या पूर्ण केली. तर अक्षरदालनचे श्री. अमेय जोशी यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकातील शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांच्या चित्रमय रेसिपी पाहिल्यानंतर, दर्दी खवय्याला आणि सुगरण गृहिणीला नक्कीच एक खजिना मिळाल्याचा आनंद होईल. हे पुस्तक कोल्हापुरातील मंगळवार पेठ मधील अक्षरदालनमध्ये मो. ७७९६६४६४२३ आणि छत्रपती ताराराणी चौकानजीकच्या भागीरथी महिला संस्थेच्या कार्यालयामध्ये ९६७३८१९२९२ विक्रीसाठी उपलब्ध आहे, असेही यावेळी सौ. अरूंधती महाडिक यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला शाहीर राजू राऊत, विशाल कुमठेकर, अमेय जोशी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *