केआयटी व पारी यांच्यात सामंजस्य करार
उद्योग आणि शिक्षणाच्या सुवर्ण मध्याने होणार विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजीच्या अभियांत्रिकी महाविद्यालय (स्वायत्त), कोल्हापूर व प्रेसिजन ऑटोमेशन अँण्ड रोबोटिक्स इंडिया (PARI) यांच्यामध्ये प्रकल्प आधारित अध्ययन व गुणवत्तापूर्ण शिक्षण या क्षेत्रातील कामासाठी सामंजस्य करार झाला. या कराराबाबतची माहिती केआयटीचे अध्यक्ष श्री. भरत पाटील यांनी दिली. या करारांतर्गत पारी केआयटीच्या विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना उद्योग क्षेत्राच्या अनेकविध संधी उपलब्ध करुन देणार आहे. विद्यार्थ्यांना नवनवीन औद्योगिक पध्दतीची माहिती देणे, उद्योग समस्यांची उकल करण्याची संधी देणे, उद्योग क्षेत्रामध्ये इंटर्नशीप आणि प्लेसमेंटची संधी देणे तसेच उद्योग क्षेत्राशी संबंधित संशोधन क्षमता विकसीत करणे याबाबत पारी सहकार्य करणार आहे. महाविद्यालयातील वेगवेगळे अभ्यासक्रमांची रचना व मुल्यमापन करण्यामध्ये पारी महत्वाचा वाटा उचलणार आहे. तसेच केआयटीला सेंटर ऑफ एक्सलन्स बनविण्यामध्ये पारी केआयटीला मार्गदर्शन करणार आहे. केआयटीच्या माध्यमातून उद्योग जगतासाठी आवश्यक असणा-या कुशल मनुष्य बळाची उपलब्धता केली जाणार आहे. भविष्यातील सदृढ अभियंता घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध उपक्रमांची शृंखला या करारांतर्गत नियोजित आहे. या करारामुळे शैक्षणिक संस्था व उद्योग यांच्यामधील अंतर कमी होण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे या करारामुळे केआयटीतील विद्यार्थ्यांना भविष्यात नोकरी व संशोधनाच्या संधी वाढणार आहे. या करारावेळी पारीच्या वतीने मनुष्यबळ व कर्मचारी संपर्क प्रमुख मा. डॉ.उदय भोसले उपस्थित होते. केआयटीच्या वतीने चेअरमन भरत पाटील, व्हा. चेअरमन सुनिल कुलकर्णी, सचिव दिपक चौगुले व संचालक डॉ.व्ही.व्ही.कार्जिन्नी हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन केआयटीचे उद्योगविश्व संपर्क अधिष्ठाता डॉ. अमित सरकार व प्रा. सयाजी पाटील यांनी केले. या कराराबद्दल केआयटीचे विश्वस्त, विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी केआयटीचे अभिनंदन केले.