कोल्हापूर महानगरपालिकेत पूर्णवेळ प्रशासकांची नेमणूक करा – आमदार जयश्री जाधव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेत पूर्णवेळ प्रशासकांची नेमणूक करावी अशी मागणी आमदार जयश्री जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनातील मजकूर असा, कोल्हापूर महानगरपालिकेचे सभागृह सध्या अस्तित्वात नसल्याने, नगरसेवकांचे अधिकार संपुष्टात आलेले आहेत. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेचा कार्यभार प्रशासक म्हणून आयुक्त पहात होते. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची २ जून २०२३ रोजी पुणे येथे बदली करण्यात आलेले आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसात नवीन प्रशासक नियुक्ती करण्यात आलेली नाही. यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रशासक पदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे आहे. कोल्हापूर शहरातील सुमारे सहा लाख नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याचे काम महानगरपालिकेकडे आहे. महानगरपालिकेचे सभागृह अस्तित्वात नाही, नगरसेवकांचे अधिकार नाहीत, अशा काळात सर्व प्रकारचे काम आयुक्त तथा प्रशासकांना पहावे लागत असताना, कोल्हापूर महानगरपालिकेत पूर्णवेळ प्रशासक नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे जिल्ह्याचा कार्यभार आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेचा प्रशासक पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना जिल्ह्यासह शहराच्या कामे पहावे लागत आहे. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेत पूर्णवेळ प्रशासकाची त्वरित नियुक्ती करावी, अशी मागणी आमदार जाधव यांनी केली आहे.