भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महाराष्ट्राचे योगदान महत्त्वाचे – डॉ. अरुण भोसले
कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतीय इतिहास अनुसंधान परिषद, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली आणि इतिहास अधिविभाग, छ. शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज विद्यापीठाच्या वि. स. खांडेकर भाषा भवनमध्ये एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न झाले. या राष्ट्रीय चर्चासत्राचा विषय ‘भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामधील पश्चिम महाराष्ट्रातील ज्ञात-अज्ञात नायक’ असा होता. या चर्चासत्राचे प्रास्ताविक छ. शाहू संशोधन केंद्राच्या समन्वयिका डॉ. निलांबरी जगताप यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भारतीय इतिहास अनुसंधान परिषद, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली आणि शिवाजी विद्यापीठ यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारातंर्गत सुरु असलेल्या विविध उपक्रमाची माहिती देऊन चर्चासत्राचा उद्देश व हेतू स्पष्ट केला. उद्घाटक व अध्यक्ष असलेले विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. एस. देशमुख यांनी मनोगत व्यक्त करताना शिवाजी विद्यापीठामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सुरु असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. तसेच भारतीय इतिहास अनुसंधान परिषद, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली आणि विद्यापीठामध्ये होत असलेल्या चर्चासत्रातून विद्यापीठ कार्यक्षेत्रातील स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या कामगिरीवर प्रकाश पडेल. त्यांचे कार्य समाजासमोर येईल. तसेच शिवाजी विद्यापीठामार्फत सुरु असलेल्या ‘अभिवादन स्वातंत्र्यसैनिकांना’ उपक्रमाची माहिती देऊन नवीन संशोधकांनी आणखी संशोधन करून अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान समाजासमोर आणण्याचे आवाहन केले.
या चर्चासत्राचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. अरुण भोसले यांनी सुरवातीला भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या सुरूवातीच्या इतिहासावर प्रकाश टाकला. १८५७ ते १८८५ म्हणजेच भारतीय राष्ट्रीय कॉंग्रसची स्थापना आणि त्यानंतर कॉंग्रेसमधील मवाळ कालखंड (१८८५-१९०५), जहाल कालखंड (१९०५-१९२०), गांधी युग (१९२०-१९४७) या सर्व टप्प्यावर भारतीय स्वातंत्र्यचळवळीत ज्या प्रकारे बदल होत गेला त्याचे सर्वसमावेशक विश्लेषण केले. पुढे बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळ विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळ आणि त्यातील ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसेनानी आणि त्यातील महत्त्वाच्या घटनांवर प्रकाश टाकला. त्यात त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्यांनी उभा केलेली प्रतीसरकार चळवळ याचे स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्व यावर प्रकाश टाकला. या चर्चासत्रास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले भारतीय इतिहास अनुसंधान परिषद, नवी दिल्लीचे सदस्य सचिव प्रा. डॉ. उमेश कदम यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशाच्या विविध भागात भारतीय इतिहास अनुसंधान परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली. पुढे बोलताना ते म्हणाले की, शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांना स्वातंत्र्य चळवळीचा एक मोठा इतिहास आहे. आणि या चळवळीतील अज्ञात नायकांचा इतिहास समाजाच्या समोर आणणे, हाच या चर्चासत्राचा मुख्य हेतू आहे. भारतीय इतिहास अनुसंधान परिषद अशा देशभरात असे विविध उपक्रम राबवून स्वातंत्र्य लढ्यातील अज्ञात नायकांना समाजासमोर आणण्यासाठी पुढाकार घेत आहे. शिवाजी विद्यापीठानेही त्यात पुढाकार घेतला त्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केले. या सत्राचे आभार इतिहास विभागाचे विभागप्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी मानले.
या चर्चासत्राच्या दुपारच्या सत्रात डॉ. विलास पोवार, प्राचार्य डॉ. अंकुश बेलवटकर, प्राचार्य डॉ. अजितकुमार जाधव हे प्रमुख वक्त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ. विलास पोवार यांनी कोल्हापूरच्या संस्थान काळातील स्वातंत्र्य चळवळीवर प्रकाश टाकला. तर डॉ. अंकुश बेलवटकर यांनी महाराष्ट्रातील सविनय कायदेभंगाच्या चळवळीचे स्वरूप आणि त्यातून येथे झालेले मीठ सत्याग्रह, जंगल सत्याग्रह इ. गोष्टींवर सविस्तर मांडणी केली. डॉ. अजितकुमार जाधव यांनी आपल्या मनोगतात १८५७ चा उठाव आणि महाराष्ट्र या विषयाशी संबंधित मांडणी केली. या सत्राच्या अध्यक्षा डॉ. नंदा पारेकर यांनी एकूणच सर्व मान्यवरांनी मांडलेल्या मुद्यातून चर्चासत्राचा हेतू स्पष्ट झाल्याचे सांगितले. तसेच नवसंशोधकांनी अजूनही स्वातंत्र्य लढ्यातील अज्ञात व्यक्तिरेखांवर संशोधन करून त्यांचा इतिहास सर्व सामान्य लोकांसमोर आणावा, असे आवाहन केले. या सत्राचे आभार डॉ. दत्तात्रय मचाले यांनी केले.