कणेरी मठावर ५० गाईंचा शिळे अन्न खाल्याने मृत्यू,
कणेरी मठ उत्सव समितीकडूनही केला गेला खुलासा
कोल्हापूर/प्रतिनिधी : सिद्धगिरी कणेरी मठावर सुरू असलेल्या सुमंगलम पंचमहाभूत महोत्सव ऐन भरत आला असताना तब्बल ५० च्या वर गायी अचानक मृत्यूमुखी पडण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तर अजूनही ३०च्या वर गायीची प्रकृती चिंताजनक आहे.गाईंच्या अचानक मृत्यूच्या वृत्ताला पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त पठाण यांनी दुजोरा दिला असून मृत गाईंचे पोस्टमार्टम करून फॉरेन्सिक लॅब मध्ये तपासणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रासह अनेक राज्यातील राजकीय नेते, मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि साधुसंतांच्या उपस्थितीत 20 फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या या महोत्सवात देशी गाई पालन आणि प्रदर्शन हा देखील एक महत्त्वाचा भाग होता. पण महोत्सव ऐन भरात आला असताना तब्बल ५० च्यावर गायी अचानक मृत्युमुखी पडल्या. तर काही अत्यावस्थ आहेत.महोत्सवासाठी परिसरातून आलेल्या भाकऱ्या आणि लोकांसाठी केलेले जेवण शिल्लक राहिल्यानंतर या गाईंना अति प्रमाणात खायला दिल्याने हा प्रकार घडला आहे का? याशिवाय गाईंच्या मृत्यूची इतर कारणे ही तपासण्यात येत आहे.दरम्यान या बातमीच्या वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारास धक्काबुक्की केली गेली आहे. या घटनेचा सर्वच पत्रकार संघटनांकडून निषेध नोंदविला गेला आहे.
कणेरी मठ उत्सव समीतीकडून आलेला खुलासा
दरम्यान गाईंचा मृत्यू हा अनपेक्षित अपघात घटना अतिशय दुर्दैवी – श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठाने खुलासा केला आहे.
श्रीक्षेत्र सिद्धगिरी कणेरी मठ येथे सुरु असलेल्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सावा दरम्यान काही गाईंचा अचानक झालेला मृत्यू हा अनपेक्षित अपघात आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. एकीकडे आम्ही जीवापाड सांभाळ करत असताना अचानक काही गाईंचा झालेला मृत्यू हा मनाला वेदना देणारी बाब आहे.
कणेरी मठाच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून हजारो गाईंचा सांभाळ केला जातो, त्यासाठी गोशाळेची स्थापना करण्यात आलेली आहे. भाकड व भटक्या गाईना कोणी वाली नाही अशा जनावरांनाहि कणेरी मठ येथील गोशाळेत आणून त्यांचे पालन पोषण केले जाते. त्यामुळे ही गोशाळा देशभर आदर्शवत आहे. वर्षाला त्यावर काही कोटी रुपये खर्च केला जातो. तसेच लम्पीच्या साथीमध्ये हजारो जनावरांना मोफत औषधे देऊन त्यांचे प्राण मठाने वाचवले आहेत. भटक्या कुत्र्यांच्यासाठी ही नुकतीच निवारा व सेवा शाळा सुरु करण्यात आलेली आहे.
पर्यावरण रक्षणाबरोबरच जनावारावरील निष्टा आणि प्रेम व्यक्त करण्यासाठीच पंचमहाभूत लोकोत्सव साजरा केला जात आहे. यातूनच देशभरतील दुर्मिळ होत असलेल्या देशी प्रजातीच्या गाई, बैल, शेळी, अश्व, गाढव, मांजर यांचे प्रदर्शन आणि स्पर्धाहि घेतल्या जात आहेत. देशी प्रजाती टिकाव्यात हाच या महोत्सवाचा हेतू आहे.
अशा वेळी काही गाईंचा अचानक झालेला मृत्यू मठाच्या दृष्टीने अतिशय वेदनादायीच आहे. कुणाच्या तरी अज्ञानांतून ही गोष्ट घडलेली आहे. ती नेमकी कशी घडली याबाबत वैद्यकीय शवविच्छेदन अहवाल लवकरच बाहेर येईलच. कृपया झालेल्या घटनेबाबत कुणीही गैरसमज करून घेवू नये इतकीच विनंती आहे. असा खुलासा हा करण्यात आला आहे.