म्हाकवेची जलजीवन योजना आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनीच मंजूर केली
काडीमात्र संबंध नसताना समरजीत घाटगेंची घुसखोरी – रमेश पाटील यांचे पत्रक
म्हाकवे/प्रतिनिधी : म्हाकवे ता. कागल गावाला स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी आम्ही आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या माध्यमातून नवीन जलजीवन पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली. ही योजना आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या माध्यमातून आम्हीच आणली. काडीमात्र संबंध नसताना समरजीत घाटगे यांची योजनेच्या भूमिपूजनाची घुसखोरी अयोग्य आहे, असे पत्रक मुश्रीफ गटाचे प्रमुख रमेश सिद्राम पाटील यांनी प्रसिद्धीला दिले आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे, आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांचे मार्गदर्शन आणि सूचनांनुसार यापूर्वीचे सर्व ठराव, प्रयत्न आणि पाठपुरावा आम्ही केलेला आहे. या योजनेच्या मंजुरीशी समरजीत घाटगे यांचा काडीमात्र संबंध नाही. तसेच, आधी आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते पाईपलाईनचा पाया खुदाई समारंभ झालेला असतानाही नंतर येऊन समरजीत घाटगेनी कार्यक्रम घेणे हे अयोग्य आणि बालिशपणाचे आहे.
समरजीत घाटगे यांनी कोणतीही माहिती न घेता अर्धवट आणि अपुऱ्या ज्ञानावर, म्हाकवे ग्रामपंचायत इमारतीच्या बांधकामाबद्दलही प्रश्न उपस्थित केला आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांचे प्रयत्न आणि पाठपुराव्यातून राष्ट्रीय ग्रामस्वराज्य योजनेतून २४ लाख रुपये मंजूर झाले आहेत. आमदार फंडातून २५ लाख मंजूर झाले आहेत. हे काम प्रगतीपथावर आहे. पुढील टप्प्यात श्री. मुश्रीफसाहेब लागेल तो निधी देणार आहेत.
पंढरपुरात म्हाकवेकरांच्या मठासाठी निधी मिळावा ही स्वर्गीय कै. शिवराम केरबा उर्फ एस. के. पाटील यांची मागणी होती. त्यानुसार आमदार श्री मुश्रीफसाहेब यांनी त्याचवेळी निधीचे पत्रही दिलेले आहे. परंतु, ट्रस्टच्या अपुऱ्या कागदपत्रांमुळे ती पूर्तता झालेली नाही. दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी श्री. पाटील यांचे निधन झाल्यामुळे हे काम जैसे थे आहे.
“खासदारांना डावलले कसे…….?
या कार्यक्रमासाठी सत्तेत असलेल्या खासदार प्रा. संजयदादा मंडलिक यांना डावलले कसे जाते? असा सवाल पत्रकात विचारला आहे. त्यांना वगळून हा कार्यक्रम घेतलाच कसा जातो, असेही म्हटले आहे.