आमदार सतेज पाटील यांच्याकडून हिंगोली येथे भारत जोडो यात्रा नियोजन बैठक
हिंगोली येथील भारत जोडो यात्रेला कोल्हापुरातून दहा हजार कार्यकर्ते सहभागी होणार
कोल्हापूर/प्रतिनिधी : खासदार राहुल गांधी यांनी सुरू केलेली भारत जोडो पदयात्रा महाराष्ट्रात दाखल झाली असून महाराष्ट्रात त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शनिवार दिनांक १२ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते या पदयात्रेमध्ये हिंगोली जिल्ह्यात सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ.सतेज पाटील यांच्या उपस्थितीत हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रशासनाबरोबर नियोजन बैठक आयोजित केली होती .कोल्हापुरातून दहा हजार कार्यकर्ते यात्रेत सहभागी होणार असून आ.सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्वांची भोजन व राहण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
भारत जोडो यात्रेमध्ये हजारो नागरिक सहभाग होत आहेत. हिंगोली मधील यात्रेबाबात जिल्हा प्रशासनासोबत कायदा सुव्यवस्था,पार्कींग,विविध विभागाकडून सर्व सेवा याबाबत चर्चा झाली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात,आ.सतेज पाटील, आ. वर्षा गायकवाड, आ. प्रज्ञा सातव,आमदार जयंत आसगावकर,माजी आमदार भाऊराव पाटील, सत्यजित तांबे,जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस प्रमुख जी.श्रीधर, जिल्हा परिषद मुख्याधिकारी संजय दैने, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे,शहर डीवायएसपी यतीश देशमुख या बैठकीला उपस्थित होते.
दरम्यान भारत जोडो यात्रेत कोल्हापुर जिल्ह्यातून जवळपास दहा हजार कार्यकर्ते हिंगोलीला रवाना झाले आहेत. शनिवार दिनांक १२ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सत्रात हिंगोली जिल्ह्यातील कळमनूरी तालुक्यातील लक्ष्मी फिलींग स्टेशन, शेवळागाव या मार्गावर हे कार्यकर्ते भारत जोडो पदयात्रेत सहभागी होणार आहेत. या सर्व कार्यकर्त्यांची सर्व व्यवस्था कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ. सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्धरित्या करण्यात आलेली आहे.
बुधवारी माजी मंत्री आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर,यांनी ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांची व्यवस्था केली आहे त्या हिंगोली येथील तिरूमला लॉन्स, मधुर विथ पॅलेस, साई रिसॉर्ट येथील विश्रांती, भोजनाची ठिकाणची पाहणी करून काही महत्त्वाच्या सूचना केल्या. या यात्रेत सहभागी होणाऱ्या कोल्हापूर जिल्यातील कार्यकर्त्यांच्या राहण्यासाठी आणि जेवण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. या सर्व व्यवस्थेवर आमदार सतेज पाटील यांनी वैयक्तिक लक्ष घातले आहे . आ.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गोकुळचे संचालक बयाजी शेळके,सचिन चौगले, माँटी मगदूम, जे.के. पाटील,विनायक सूर्यवंशी, एस. के. शिंदे यांची टीम गेल्या १५ दिवस हिंगोली नियोजनात व्यस्त आहे.
चौकट
कोल्हापूरातून कार्यकर्ते उत्साहात सहभागी होणार
राहूल गांधी यांच्या पदयात्रेत सहभागी कोल्हापूरचे कार्यकर्ते भगवे फेटे, टी शर्ट घालून उत्साहात सहभागी होणार आहेत. लेझीमपथक, ढोलताशा या पारंपारीक वाद्यासह मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके, तसेच कुस्तीची प्रात्यक्षिके या पदयात्रा या मार्गावर दाखवण्यात येणार आहेत.