आजारपणावर मात केल्यानंतर डॉ. विलास उजवणेंचं झोकात पुनरागमन; ‘कुलस्वामिनी’ चित्रपटात प्रमुख भूमिका!
‘कुलस्वामिनी’ हा चित्रपट येत्या ११ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित
कोल्हापूर/प्रतिनिधी : डॉ. विलास उजवणे हे नाव मराठी चित्रपटसृष्टीसाठी काही तसं नवीन नाही. आजवर अनेक मराठी चित्रपट आणि नाटकांमधून डॉ. विलास उजवणे यांनी आपल्या अभिनयाची छाप मराठी सिनेरसिकांच्या मनावर उमटवली आहे. तेवढ्याच ताकदीनं त्यांचा वावर हिंदी चित्रपटसृष्टीतही अनुभवायला मिळाला आहे. मात्र, मध्यंतरीच्या काळात नियतीनं त्यांना आजारपणाचा मोठा धक्का दिला. अर्धांगवायूच्या झटक्यामुळे त्यांचं वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही आयुष्यांना हादरा बसला. पण या गंभीर आजारावर धीरोदात्तपणे मात करत डॉ.विलास उजवणे पुन्हा उभे राहिले. अशा कोणत्याही संकटामुळे त्यांच्यातल्या अभिनयाची धार कमी होऊ शकत नाही, हेच दाखवून देण्यासाठी आगामी ‘कुलस्वामिनी’ चित्रपटातून डॉ. विलास उजवणे त्यांच्या अभिनयाचे पैलू प्रेक्षकांसमोर मांडण्यासाठी सज्ज झाले आहेत.
देवीमातेच्या अगाध लीलेचं दर्शन प्रेक्षकांना घडवणारा ‘कुलस्वामिनी’ हा चित्रपट येत्या ११ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. अल्ट्रा मीडिया अॅण्ड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे निर्माते कंपनीचे सीईओ सुशीलकुमार अग्रवाल आहेत. लघुपट, चित्रपट आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील चित्रपटांचा अनुभव गाठीशी असलेले जोगेश्वर ढोबळे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाचा भक्तीरसाने परिपूर्ण असा ट्रेलर आज लाँच करण्यात आला. ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपटाविषयी रसिक प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड ताणली गेली आहे. पण ट्रेलरमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते चित्रपटातील प्रमुख पात्र वठवणारे अभिनेते डॉ. विलास उजवणे आणि अभिनेत्री चित्रा देशमुख यांनी.
आजारपणातून उठल्यानंतर डॉ. विलास उजवणे यांनी पुन्हा एकदा मराठी सिनेरसिकांचं मनोरंजन करण्यासाठी कंबर कसली आहे. या चित्रपटातून त्यांचा तेवढ्याच ताकदीचा अभिनय पाहायला मिळणार याविषयी त्यांच्या चाहत्यांच्या मनात अजिबात शंका नाही. देवीमातेच्या भक्तीमध्ये वाहून घेतलेल्या कल्याणी देशमुख यांच्या पतीची, अर्थात बाळासाहेब देशमुख ही व्यक्तीरेखा विलास उजवणे साकारत आहेत.ज्या गावात हे सगळं कथानक घडतं, त्या गावातील एका प्रभावशाली व्यक्तीचं हे पात्र आहे. चार वर्षांपूर्वी डॉ. विलास उजवणे यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. पण या आजाराशी दोन हात करत विलास उजवणे पुन्हा खंबीरपणे उभे राहिले. त्यांचा हाच खंबीरपणा त्यांच्या अभिनयातही अलगद उतरल्याचं त्यांनी आजवर साकारलेल्या व्यक्तीरेखांमधून ठायीठायी जाणवतं. ‘कुलस्वामिनी’मधील त्यांची व्यक्तीरेखाही हेच पटवून देणारी असेल, हे काही वेगळं सांगायला नको!
कल्याणी ही व्यक्तीरेखा अभिनेत्री चित्रा देशमुख साकारत आहेत १९९२ साली प्रदर्शित झालेल्या ‘दौलत की जंग’ पासून या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘ढ लेकाचा’मधून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री चित्रा देशमुख हे नावही मराठी चाहत्यांमध्ये सर्वश्रुत असंच आहे.कल्याणी यांचं देवीशी असणारं नातं आणि त्यातून उलगडत जाणारं चित्रपटाचं कथानक चित्रपगृहांमध्ये दाखल होणाऱ्या प्रेक्षकांना अलगद हात जोडून भक्तीरसात भिजवून टाकण्यात यशस्वी ठरेल हे चित्रपटाचा ट्रेलर पाहून सहज लक्षात येतंय.