इमॅजीनियस स्टुडिओतर्फे सुप्रसिद्ध संगीतकार नौशाद यांच्या गाण्यावर आधारित “नौशादगी”हा अनोखा कार्यक्रम
कोल्हापूर/प्रतिनिधी: इमॅजीनियस स्टुडिओतर्फे सुप्रसिद्ध संगीतकार नौशाद यांच्या गाण्यावर आधारित “नौशादगी”हा अनोखा कार्यक्रम मंगळवार दिनांक ८ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजता केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूर येथे आयोजित केला आहे. अशी माहिती पराग ठाणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापुरातील सुगम संगीतातील एक आदरणीय गुरु सुचित्रा दीदी मोर्डेकर यांची ही संकल्पना व स्वप्न स्टुडिओने स्वीकारले.२००४ पासून कार्यरत असलेल्या इमॅजीनियस स्टुडिओने आजपर्यंत दास्ताने इश्क, कशिश, तडप, कोशिश, मुरली और पायल,रिदम क्लासिक्स वन, कामदेव महात्म्य असे अनेक दर्जेदार कार्यक्रम दिले आहेत. याच मालिकेतील नौशादगी हे नवीन पुष्प! मौसीकी के शहंशाह नौशाद यांनी सातत्याने अभिजात शास्त्रीय संगीताचा पाठपुरावा केला. सर्व वाद्यांचा योग्य मिलाफ आणि समतोल ही त्यांची खासियत, तर गायकांच्या बरोबरीने महत्त्वाचा ठरणारा कोरस हे त्यांचे वेगळेपण! त्यांच्या कांही अत्यंत लोकप्रिय, कांही वैशिष्ट्यपूर्ण, तर कांही कोरस गाण्यांची ही मैफिल!
या कार्यक्रमासाठी आकाशवाणीवरील ३५ वर्षांचा अनुभव असणारे श्री.मंगेश वाघमारे यांचे रसाळ व माहितीपूर्ण निवेदन असणार आहे. त्याचबरोबर मूळचे कोल्हापूरचे, कलांजलीचे विद्यार्थी असणारे सुप्रसिद्ध गायक प्रसेनजित कोसंबी व शर्वरी जाधव यांचा या कार्यक्रमात मुख्य सहभाग असणार आहे. तसेच इमॅजीनियस स्टुडिओचे कलाकार प्रशांत नंदे, शिरीष कुलकर्णी, रविराज पवार, मुकुंद वेल्हाळ व राधिका ठाणेकर, तसेच कोरस कलाकार सहभागी होणार आहेत. गुरुनानक जयंतीच्या सुट्टी दिवशी, म्हणजे मंगळवार दिनांक ८ नोव्हेंबर २०२२ रोजी, सायंकाळी चार वाजता, केशवराव भोसले नाट्यगृह येथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. रसिक श्रोत्यांनी या सुरेल मैफिलीचा जरूर लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. पत्रकार परिषदेस पराग ठाणेकर,राधिका ठाणेकर, मुकुंद वेल्हाळ, रवी पवार, प्रिया मोघे, प्रशांत नंदे, प्रसाद जमदग्नी, शिरीष कुलकर्णी आदी उपस्थित होते.