महाराष्ट्र संघ दुहेरी मुकुटाचा मानकरी फेडरेशन चषक रोलबॉल स्पर्धा : उत्तर प्रदेश, राजस्थान उपविजेते
पुणे / प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या मुलांनी उत्तर प्रदेश संघाला तर मुलींनी राजस्थान संघाला पराभूत करताना महाराष्ट्र रोलबॉल संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या फेडरेशन चषक रोलबॉल स्पर्धेत दुहेरी मुकुट पटकावला. स्पर्धेचे बक्षीस वितरण बडवे इंजिनियरिंगच्या संचालिका सुप्रिया बडवे, उद्योगपती सुजित जैन, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संचालक अमेय येरवडेकर व महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रोलबॉल खेळाचे जनक राजू दाभाडे, आशियाई रोलबॉल संघटनेचे सचिव आनंद यादव, भारतीय रोलबॉल संघटनेचे सचिव चेतन भांडवलकर,प्रताप पगार व अमितकुमार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा रोलबॉल संघटनेच्या बाणेर येथील मैदानावार सुरु असलेल्या स्पर्धेच्या अंतिम लढतीत महाराष्ट्र संघाने उत्तर प्रदेश संघाला १०-५ असे पराभूत केले. मध्यंतराला महाराष्ट्राने ५-२ अशी तीन गोलची आघाडी घेतली होती. महाराष्ट्र संघाकडून हर्षल घुगे (१२.३०, २३.४१, ३३.२५ मिनिटे) व अमितेश बोधाडे (१४.१५, २७.१२ ३२.५० मिनिटे) यांनी प्रत्येकी ३, आदित्य गणेशवाडेने २ (३.४५, ३०.५५ मिनिटे) तर अथर्व धायगुडे (०.३८ मिनिट) व मधुसुधन रत्नपारखी (३९.०३ मिनिटे) यांनी प्रत्येकी १ गोल केला. उत्तर प्रदेश संघाकडून सचिन सैनीने २ (६.१५, ४२.४६ मिनिटे), गोविंद गौर (११.४८ मिनिटे), विशाल वर्मा (१५.०९ मिनिटे) व खेतान सैनी (३९.३३ मिनिटे) यांनी प्रत्येकी एक गोल केला. मुलींच्या गटाच्या अंतिम फेरीत महाराष्ट्र संघाने राजस्थान संघाला ६-१ असे पराभूत केले. महाराष्ट्र संघाने मध्यंतराला ३-१ अशी २ गोलांची आघाडी घेतली. महेक राउतने ३ (१८.५१, २६.२९, ४६.४९ मिनिटे) ३ तर श्रुती भगतने २ (१.०७, १४.०२ मिनिटे) व सई शिंत्रेने १ (२७.१९ मिनिटे) गोल केला. राजस्थान संघाकडून प्रीतीका तारावतने (४८.१३ मिनिटे) एकमात्र गोल केला.
तत्पूर्वी तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या मुलांच्या गटाच्या लढतीमध्ये गोवा संघाने मध्य प्रदेश संघाला ५-४ असे पराभूत केले. गोवा संघाकडून श्रेयस बोंबलेने ५ (१२.२४, १४.५२, २३.०९, ३४.२२, ४९.२० मिनिटे) गोल केले. मध्य प्रदेश संघाकडून आदित्य अवस्थीने २ (२९.५५, ४४.४९ मिनिटे) तर आदित्य राणावत (३०.४२ मिनिटे) व गुरुवचन सिंग (३२.०२ मिनिटे) यांनी प्रत्येकी एक गोल केला. मुलींच्या तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीमध्ये झारखंड संघाने छत्तीसगड संघाला ७-३ असे पराभूत केले. मध्यंतराला झारखंड संघाने ५-२ अशी आघाडी घेतली. झारखंड संघाकडून इशा सोनकर (२७.५८, २९.४४, ३८.२४ मिनिटे) व लव्हली कुमारी (२१.४०, ४३.०७, ४८.४७ मिनिटे) यांनी प्रत्येकी ३ तर उझ्मा खानमने (२.५५ मिनिट) एक गोल केला. छत्तीसगड संघाकडून इशा साहूने ३ (१०.४५, ४६.३५, ४९.०१ मिनिटे) गोल करताना लढत देण्याचा प्रयत्न केला.