व्यापाऱ्यांच्या समस्यांचे निराकारण करा- स्थायी समिती सभापती सचिन पाटील
कोल्हापूर/प्रतिनिधी : शहरातील व्यापाऱ्यांकडून थकित स्थानिक संस्था कराच्या वसूलीसाठी व्यापारी असोसिएशन निहाय कॅप्म लावा, व्यापाऱ्यांच्या काही समस्या व शंका असल्यास त्यांचे योग्य पध्दतीने निराकरण करा, अशी सुचना स्थायी समिती सभापती सचिन पाटील यांनी केली.
स्थानिक संस्था कर विभागाच्यावतीने थकित कराबाबत आढावा घेण्यासाठी स्थायी समिती सभापती सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभागृहात बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस गटनेते शारगंधर देशमुख, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, मुख्याधिकारी विलास सांळोखे यांच्यासह शहरातील सर्व व्यापारी असोसिएशन तसेच व्यापारी संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.
महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने व्यापाऱ्यानी त्यांच्याकडील स्थानिक संस्था कराची थकीत देय रक्कम भरुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करुन सभापती सचिन पाटील म्हणाले, स्थानिक संस्था कराच्या वसूलीसाठी कॅम्प लावून थकीत देय रक्कम वसूल करण्याबरोबरच व्यापाऱ्यांच्या काही अडचणी असतील तर त्या सोडविण्यास प्राधान्य द्यावे. या कॅम्पमध्ये व्यापाऱ्यांनी सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहून थकीत स्थानिक कराचा प्रश्न सोडवून घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
व्यापाऱ्यांना महापालिकेचे निश्चितपणे सहकार्य – गटनेते शारगंधर देशमुख यांनी सांगितले ते म्हणाले शहरातील व्यापाऱ्यांनी महापालिकेचा स्थानिक संस्था कर लवकरात लवकर भरावा. शासन आदेशानुसार कराची आकारणी आणि वसूली होणे गरजेचे आहे. जर चुकीच्या पध्दतीने कर आकारणी झाली असेल तर त्याबाबत महापालिका सकारात्मक भूमिका घेईल. व्यापाऱ्यांनी या कॅम्पमधून आपली सर्व कागदपत्रे सादर करुन आपल्या शंका समाधान करुन घ्यावे. महापालिका व्यापाऱ्यांना सर्वतोपरी मदत व सहकार्य करेल. तसेच व्यापाऱ्यांनी एकदा आपली कर निश्चिती फायनल करुन घ्यावी. त्यानुसार होणारी देय रक्कम एक रक्कमी भरावी. यामध्ये काही अडचणी असल्यास महापालिका टप्पे ठरवून देईल. सदरचे कर भरल्याने महापालिका आर्थीक अडचणीतून बाहेर पडेल. आपण आपला कर शहराच्या विकासाठीच वापरला जाईल. तसेच यावेळी त्यांनी अभययोजनेची माहिती घेतली.
अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई म्हणाले शहरातील व्यापाऱ्यांकडून थकित स्थानिक संस्था कराच्या वसूलीसाठी व्यापारी असोसिएशनच्या मदतीने असोसिएशन निहाय कॅप्म लावण्याचे नियोजन केले जाईल. व्यापाऱ्यांनी आपली सर्व कागदपत्रांची कॅम्प दिवशीच पुर्तता केल्यास त्याच दिवशी कर निश्चिती करुन दिले जाईल. शहरातील नोंदणीकृत एकूण व्यापारी तसेच अभययोजनेस सहभाग घेतलेले व्यापारी यांची माहिती दिली.
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे संजय शेटे म्हणाले महापालिकेचा स्थानिक संस्था कर व्यापारी निश्चितपणे भरतील. याबाबत महापालिका प्रशासनाने विशेष कॅम्प लावावेत. व्यापारी असोसिएशन व्यापाऱ्यांकडून सर्व असेसमेंट राहिले असेल तर ती पूर्ण करुन घेईल. व्यापाऱ्यांनीही आपल्या सर्व कागदपत्रासह कॅम्पमध्ये सहभाग घेऊन शासन नियमांनुसार आपली कर निश्चिती करुन घ्यावी. आणि देय असणारा कर भरावा, याकामी चेंबर ऑफ कॉमर्स निश्चितपणे पुढाकार घेऊन दिवाळीपुर्वी अधिकाधिक कर भरुन महापालिकेला सहकार्य केले जाईल असे ते म्हणाले.
प्रारंभी मुख्याधिकारी विराज सांळोंखे यांनी थकीत स्थानिक संस्था कराची माहिती दिली. तसेच शासन आदेशाचीही माहिती यावेळी दिली.
यावेळी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, मानद सचिन धनंजय दुगे, संचालक राहुल नष्टे, कोल्हापूर कापड व्यापारी संघाचे अध्यक्ष संपत पाटील, कोल्हापूर चेंबर व्यापारी प्रतिनिधी जयंत गोयानी, भावेश भानुशाली, कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड, कोल्हापूर इंडिस्ट्रिज असोसिएशन प्रदीप व्हरांबळे, किराणा भुसारी व्यापारी असोसिएश चंद्रकांत रोटे यांच्यासह शहरातील सर्व व्यापारी असोसिएशन तसेच व्यापारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.