राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले; ७ हजार ३१२ क्युसेक्स विसर्ग
कोल्हापूर, दि. १० (जिमाका) : कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक राधानगरी धरणाचा पहिला स्वयंचलित दरवाजा आज पहाटे ५.३० वाजता (दरवाजा क्रमांक ६) उघडला. सकाळी ८.५५ वाजता दरवाजा क्रमांक ५ उघडला. तसेच दुपारी २.२० वाजता स्वयंचलित दरवाजा क्रमांक ३ तर दुपारी ३.२० वाजता स्वयंचलित दरवाजा क्रमांक ४ उघडला. राधानगरी धरणाचे एकूण चार दरवाजे (क्रमांक ३,४,५,६) उघडले असून त्यातून एकूण ७ हजार ३१२ क्युसेक्स विसर्ग सुरु आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे (उत्तर) कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दिली आहे.
जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्र व मुक्त पाणलोट क्षेत्रातील पाऊस व धरणातील विसर्ग यामुळे जिल्ह्यातील पंचगंगा नदीसह सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी व शासकीय यंत्रणांनी दिलेल्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन श्री. बांदिवडेकर यांनी केले आहे.