आमदार हसन मुश्रीफ यांनी सोडला मुंबईतील सरकारी बंगला बंगल्यात राहणारे रुग्ण आणि नातेवाईकांनी घेतला भावुक निरोप
आमदार मुश्रीफ यांचे आभार मानत बंगला सोडताना रुग्णांची पावले झाली जड – आमदार मुश्रीफ यांनी जड अंतःकरणाने दिला रुग्णांना निरोप
मुंबई/प्रतिनिधी : राज्यात सत्ताबदल झाल्यामुळे माजी ग्रामविकास आणि कामगार कल्याण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुंबईतील सरकारी बंगला रिकामा केला. कोल्हापूर जिल्ह्यातून गंभीर आजारांवर उपचार घेण्यासाठी मुंबईत येणाऱ्या शेकडो रुग्णांच्या निवासाची सोय याच बंगल्यात केली जात असे. जिल्ह्यातील रुग्णांसाठी मंत्री मुश्रीफ यांचा हा बंगला म्हणजे ‘हक्काचे घर’ होते. मात्र राज्यात सत्ताबदल झाल्याने मंत्र्यांना मिळणारा हा बंगला आमदार हसन मुश्रीफ यांना रिकामा करावा लागला. त्यामुळे या बंगल्यात मुक्कामी असणारे अनेक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक जड पावलांनी तिथून बाहेर पडले.
हजारो रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया
याविषयी बोलताना आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, “मुंबईतील अनेक दवाखाने हे धर्मादाय म्हणजेच पब्लिक ट्रस्ट कायद्याखाली नोंदणी झालेले आहेत. परंतु कुठलेही दवाखाने हे गरीबांची सेवा करत नव्हते. मोठमोठ्या उद्योगपती, डॉक्टरांचे हे दवाखाने शेकडो कोटींच्या सवलती घेऊनही गरीबांना सेवा देत नसल्याचे चित्र होते. त्यामुळे अशी सेवा न देणाऱ्या रुग्णालयांसाठी आम्ही कायदा करून तीन महिन्यांच्या सक्तमजुरीची शिक्षा आणि २५ हजार रुपयांच्या दंडाची तरतूद केली. त्यानंतर गेल्या १८ ते २० वर्षात लाखो लोकांवर मोफत शस्त्रक्रिया होऊ लागल्या. हा कायदा झाल्यानंतर एक कमिटी नेमण्यात आली. मंत्री या नात्याने मी कमिटीचा अध्यक्ष झालो. त्यानंतर सर्व दवाखान्यांमध्ये गरीब आणि अतिगरीब लोकांसाठी एक वेगळं काउंटर आणि डॅश बोर्ड लावणे सक्तीचे करण्यात आले. त्यामुळे रुग्णालयात गेल्या गेल्या गरिबांसाठी राखीव असणाऱ्या एकूण बेडपैकी नेमके किती शिल्लक आहेत, हे समजू लागलं.
बंगल्यातच रुग्णांसाठी खोल्या
गेल्या १५ वर्षांपासून अविरतपणे दर आठवड्याला २५ ते ३० रुग्ण ग्रामीण भागातून मुंबईला आणणे आणि त्यांच्यावर मोफत उपचार करून सुखरूपपणे घरी पोहोचवण्याचे काम हसन मुश्रीफ यांच्यामार्फत केले जाते. यापूर्वीच्या सर्व मंत्रिपदांच्या काळात आमदार मुश्रीफ यांनी त्यांना मिळालेल्या सरकारी बंगल्यातील काही खोल्या या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या निवासासाठी ठेवलेल्या असत. तर, मंत्रीपद नसताना आमदार निवासातील खोल्यांमध्ये रुग्णांची सोय करण्यात येत असे.
आमदार मुश्रीफांनी व्यक्त केली खंत
राज्यात सरकार बदलल्यामुळे मंत्र्यांसाठी मिळणारा बंगला आता आमदार हसन मुश्रीफ यांनी सोडला आहे. त्याचप्रमाणे आमदार निवासातील खोली मिळायला काही वेळ जाणार आहे. दरम्यानच्या काळात ही रुग्णसेवा खंडित करावी लागेल, याची खंत आ. मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे. आमदार निवासाची खोली मिळेपर्यंत रुग्णसेवा करता येणार नाही, याची खंत वाटते आणि बंगल्यावर मुक्कामी असणाऱ्या रुग्णांना जड अंतःकरणाने निरोप द्यावा लागत आहे, अशी प्रतिक्रिया आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. रुग्णही झाले भावूक
मुंबईतील बंगल्यावर मुक्कामी असणारे सुमारे ४० ते ४५ रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक सरकारी बंगल्यातून बाहेर पडताना भावूक झाले होते. सौ. अंजना गंगाराम कांबळे हे त्यांचे पती श्री. गंगाराम कांबळे यांच्यावरील उपचारासाठी गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील आ. मुश्रीफ यांच्या सरकारी बंगल्यावर मुक्कामी होत्या. त्या म्हणाल्या, “माझ्या पतीवर वेळेत उपचार केले गेले नसते, तर त्यांच्या शरीराची एक बाजू अपंग होण्याची भिती होती. आम्ही कराडपर्यंत सर्वत्र जाऊन आलो, मात्र कुठेच ऑपरेशन होत नव्हतं. त्याचा खर्चही आम्हाला परवडणारा नव्हता. अखेर आ. मुश्रीफ यांना भेटल्यावर आम्हाला मार्ग दिसला. त्यांनी स्वखर्चाने आम्हाला मुंबईत आणले आणि माझ्या पतीचे ऑपरेशन झाले. आ. मुश्रीफ हे आम्हाला ईश्वरासारखे आहेत. पण आता हा बंगला सोडावा लागत असल्याने फार वाईट वाटत आहे.”