सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याकडून तिरंगा ध्वजांचे वितरण
सेनापती कापशी जिल्हा परिषद मतदारसंघात “फडकणार हर घर तिरंगा
अध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्या हस्ते सरपंच व ग्रामसेवकांना समारंभपूर्वक वितरण
सेनापती/प्रतिनिधी : बेलेवाडी काळम्मा ता. कागल येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर अध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्या हस्ते तिरंगा ध्वजांचे वितरण झाले. या कारखान्याने “हर घर तिरंगा” या मोहिमेत अग्रभागी राहत सेनापती कापशी जिल्हा परिषद मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या सर्व म्हणजे २४ गावांना ध्वजांचे समारंभपूर्वक वितरण केले. या गावांचे सरपंच व ग्रामसेवक यांनी ध्वज स्वीकारले.भाषणात कारखान्याचे अध्यक्ष नविद मुश्रीफ म्हणाले, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा स्वतंत्र भारताच्या वाटचालीचा फार मोठा यशस्वी टप्पा आहे. त्यानिमित्त “हर घर तिरंगा” ही मोहीम मोठ्या उत्साहात, आनंदात आणि स्वाभिमानाच्या वातावरणात साजरी करूया. आपल्या घरांचा परिसर स्वच्छ व सुशोभीत करून दारात सडारांगोळी घालून मोठ्या उत्साहात तिरंगा ध्वज फडकवा, असे आवाहनही त्यांनी केले. तरुणांनी धाडसाने पुढे येण्याची गरज आहे. कारण देशाला महासत्ता बनविण्यासाठी तरुणांच्या हाताला बळ मिळण्याची गरज आहे. त्यासाठी आमदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने लागेल ती मदत आणि सहकार्य करू, असेही ते म्हणाले.
बेलेवाडी काळम्माचे ग्रामसेवक राजेंद्र सातवेकर म्हणाले, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यामुळे चिकोत्रा खोऱ्यात कृषी -औद्योगिक क्रांती झाली. या खोऱ्यासह तालुक्यातील हजारो बेरोजगार हातांना रोजगार मिळाला.
अर्जुनवाडाचे सरपंच प्रदीप पाटील म्हणाले, या कारखान्याचे संस्थापक आमदार हसनसाहेब मुश्रीफ व अध्यक्ष नविदसाहेब मुश्रीफ यांनी नेहमीच विधायक गोष्टींचे समाजकारण केले आहे.
“राष्ट्रकार्याला हातभार….”
सेनापती कापशीच्या सरपंच सौ. श्रद्धा सतीश कोळी म्हणाल्या,
कारखान्याचे संस्थापक आमदार हसनसाहेब मुश्रीफ, अध्यक्ष नविदसाहेब मुश्रीफ यांनी या साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य दिलेच आहे. तिरंगा ध्वजाच्या वितरणाच्या माध्यमातून हर घर तिरंगा मोहिमेत सक्रिय अग्रभागी राहत, राष्ट्रकार्यालाही मोठा हातभार लावला आहे.व्यासपीठावर माजी पंचायत समिती सदस्य जोती मुसळे, धनाजी तोरस्कर, शिरसाप्पा खतकल्ले, विजय पाटील, सागर पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक जनरल मॅनेजर संजय शामराव घाटगे यांनी केले. सूत्रसंचालन विशाल बेलवळेकर यांनी केले. आभार लेबर ऑफिसर संतोष मस्ती यांनी मानले.सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर सेनापती कापशी जिल्हा परिषद मतदार संघातील गावांना अध्यक्ष नविदसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते तिरंगा ध्वजांचे वितरण झाले.