महाराष्ट्राच्या परंपरेचे भान असणारा व्यक्ती राज्यपाल म्हणून नेमावा – छत्रपती संभाजीराजेंची राष्ट्रपती व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी
कोल्हापूर/प्रतिनिधी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई बाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी आज ट्विट करीत एकप्रकारे भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून हटविण्याची व याठिकाणी महाराष्ट्राची परंपरा जाणणारा व त्याबद्दल आदर असणारा योग्य व्यक्ती नेमावा, असे म्हटले आहे.छत्रपती संभाजीराजे यांनी असे ट्विट केले आहे की,
विद्यमान राज्यपाल महोदयांची जीभ वारंवार घसरते आहे. शिवरायांबद्दलचे वक्तव्य असो, महात्मा फुले व सावित्रीबाईंबद्दल पातळी सोडून बोलणे असो अथवा मुंबई बद्दल वक्तव्य करून मराठी माणसाची अस्मिता दुखावणे असो, हे महाशय केवळ राज्यपाल पदाचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहेत.त्यामुळे, देशाच्या राष्ट्रपती महोदया व पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी तात्काळ या विषयात गांभीर्याने लक्ष घालून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचे भान असणारा व त्याबद्दल आदर असणारा एखादा सुयोग्य व्यक्ती महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून नियुक्त करावा.अशी मागणी केली आहे.