प्रोत्साहनपर लाभ योजनेतील जाचक निकषांमुळे जिल्ह्यातील बहुतांशी शेतकरी राहणार वंचित
जिल्हा बँक संचालक मंडळ सभेत जाचक अटी रद्द करण्याचा ठराव
मागणीचा ठराव पाठविला सरकारकडे
कोल्हापूर/प्रतिनिधी : प्रोत्साहनपर लाभ योजनेतील जाचक निकषांमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी शेतकरी लाभापासून वंचितच राहणार आहेत. या योजनेतील जाचक अटी रद्द करण्याचा ठराव कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ सभेत झाला. बँकेचे अध्यक्ष व आमदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळ सभेत हा ठराव सरकारकडे पाठविण्यात आला.राज्य सरकारने याबाबतचा एक निर्णय शुक्रवार दि. २९ जुलै २०२२ जारी केलेला आहे. या निर्णयानुसार सन २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या तीन आर्थिक वर्षांचा कालावधी विचारात घेण्यास मान्यता दिलेली आहे. या तीनपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात कर्जउचल करून नियमितपणे परतफेड केलेले शेतकरी लाभार्थी म्हणून पात्र ठरणार आहेत. मात्र, जे शेतकरी या तीनपैकी एकच वर्ष कर्जउचल करून परतफेड केलेली आहे, ते या लाभापासून वंचित राहणार आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसपिक कर्जाचे प्रमाण ९७% आहे. दरम्यान; राज्य सरकारने पिक कर्जाचे वितरण आर्थिक वर्षानुसार ग्राह्य धरल्यामुळे या तीन आर्थिक वर्षांमध्ये दोन हंगामाचे ऊस पिककर्जाचे वितरण होते. त्यामुळे कर्ज परतफेडीच्या तारखा लगतचा जून महिना व त्यापुढील जून महिना याप्रमाणे निश्चित होतात. पण शासनाच्या निकषानुसार लगतचाच जून महिना कर्ज परतफेडसाठी ग्राह्य धरल्यामुळे वसूल देणारे शेतकरी या योजनेपासून वंचित राहतात.शासन निर्णयानुसार आर्थिक वर्ष सन २०१९-२० या कालावधीमध्ये कोविड-१९ या संसर्गजन्य आजारामुळे शासनाने वेळोवेळी टाळेबंदी जाहीर केली होती. त्यामुळे सन २०१९-२० या आर्थिक वर्षात बऱ्याच शेतकऱ्यांना पीककर्जाची उचलही करता आलेली नाही. अशा शेतकऱ्यांसाठी शासनानेच कर्ज उचलीसाठी मुदत वाढवून दिली होती. त्यानुसार शेतकऱ्यांनी कर्जाची उचल पुढील तीन महिन्यात म्हणजेच एक एप्रिल २०२० ते ३० जून २०२० या कालावधीत केली आहे. या पद्धतीने कोरोना काळातील म्हणजेच सन २०१९ -२० या आर्थिक वर्षातील कर्जउचल दिसून येत नाही. तीन महिन्यातील एकूण ९२,०८८ शेतकरी या योजनेपासून वंचितच राहणार आहेत.
यावेळी उपाध्यक्ष आमदार राजूबाबा आवळे, आमदार राजेश पाटील, माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, आमदार पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील, आमदार डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर, माजी आमदार अमल महाडिक, ए. वाय. पाटील, प्रताप उर्फ भैय्या माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, रणजीतसिंह पाटील, प्रा. अर्जुन आबिटकर, सुधिर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, विजयसिंह माने, सौ. श्रुतिका काटकर, सौ. स्मिता गवळी हे संचालक उपस्थित होते.