कोल्हापुरात सप्टेंबरमध्ये भव्य ज्वेलरी मशिनरीचे प्रदर्शन
पाच जिल्ह्यांतून व्यावसायिक भेट देणार – ओसवाल, नागवेकर यांची माहिती
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुरात सप्टेंबरमध्ये भव्य असे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले ज्वेलरी मशिनरीचे प्रदर्शन आयोजित केल्याची व त्याला पाच जिल्ह्यांतून सराफ व्यावसायिक भेट देतील, अशी माहिती केएनसी सर्व्हिसेसच्या क्रांती नागवेकर व कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी आज हॉटेल पॅव्हेलियन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या संदर्भात अधिक माहिती देताना ते म्हणाले, कोल्हापूरचा साज महाराष्ट्राचा ताज या टॅगलाईन अंतर्गत होणारे केएनसी सर्व्हिसेस प्रस्तुत, कोल्हापूर जिल्हा सराफ संघ आयोजित व स्थानिक संघटनांच्या सहयोगाने प्रदर्शन आयोजित केले आहे. कोल्हापूर जिल्हा दागिने उत्पादनाचे मोठे केंद्र आहे. जवळपास २५ हजार कारागीर या व्यवसायावर अवलंबून आहे, मात्र त्यांनी तंत्रज्ञानाऐवजी पारंपरिकतेवर भर दिला. त्यामुळे देशभर नाही तर जगभर ओळख असणाऱ्या येथील दागिन्यांची कालौघात मागणी कमी झाली आणि आपल्यानंतर कित्येक शहरांनी तंत्रज्ञानाचा वापर केला व तेथील दागिने आजघडीला सर्वदूर ओळखू जाऊ लागले आहेत. एक दागिना साधारण आठ कारागिरांच्या हातून जाऊन तयार होतो. त्या दृष्टीने त्यासाठी आवश्यक मशिनरींचे प्रदर्शन येथे महासैनिक दरबार हॉल येथे १२ व १३ सप्टेंबरला होत आहे. विशेष करून चांदीच्या दागिन्यांसाठी लागणाऱ्या मशिनरीच्या स्टॉलबरोबर स्थानिक व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने त्यांचेही निवडक स्टॉल असतील. सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत होणाऱ्या प्रदर्शनासाठी कोल्हापूरच नाही तर सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बेळगाव व गोवा येथून सराफ व्यावसायिक उपस्थित राहतील.दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात फक्त प्रदर्शनच नाही तर व्यावसायिकांमध्ये वैचारिक देवाणघेवाण होण्याच्या दृष्टीने संबंधित चर्चासत्रे, गटचर्चांचे आयोजन केले आहे. केएनसी सर्व्हिसेस ही या क्षेत्रातील नामवंत अशी कंपनी असून देशभर या कंपनीच्या वतीने प्रदर्शनांचे आयोजन केले जाते. याच वर्षी एप्रिल महिन्यात त्यांनी जेएमएआयआयई, जे जगातले पहिलेवहिले ज्वेलरी मशिनरीचे भव्य प्रदर्शन भरवले होते आणि गेल्याच महिन्यात गोवा येथे भारत-बांगलादेश दरम्यान व्यापार वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने प्रदर्शन आयोजित केले होते. त्यांचे कोलकता, केरळ आणि ओडिशा येथेदेखील असेच व्यावसायिक प्रकल्प राबविण्यात येतात. दरम्यान, येथे होणाऱ्या प्रदर्शनासाठी देशभरातील मशिनरी उत्पादक कंपन्यांनी स्टॉल बुक केले आहेत. मशिनरीबरोबर व्यावसायिक आदान-प्रदान करण्यात येणाऱ्या या प्रदर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नागवेकर व ओसवाल यांनी केले. सचिव माणिक जैन यांनी स्वागत केले. सहसचिव संजय पाटील यांनी आभार मानले.यावेळी कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल, उपाध्यक्ष विजय हावळ, सचिव तेजस धडाम, कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे उपाध्यक्ष दिनकर ससे, दीपक वेर्णेकर, खजानिस जितेंद्र राठोड यांच्यासह संचालक व शहर, हुपरी परिसरातील संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.