गोरगरिबांच्या सेवेसाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालणार – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे भावनिक उदगार
कागलमध्ये निराधारांना पेन्शन वाटप, विद्यार्थ्यांना दाखले वाटप व लहान मुलांच्या आरोग्य मोहिमेचा प्रारंभ
नामदार हसन मुश्रीफ फाऊंडेशन, ॲस्टर आधार व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमानातून लहान मुलांच्या मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया मोहिमेचा प्रारंभ
कागल/प्रतिनिधी : गोरगरीबांच्या सेवेसाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालणार असल्याचे भावनिक उदगार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून त्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करीत आहे, असेही ते म्हणाले.कागलमध्ये निराधारांना पेन्शन वाटप, विद्यार्थ्यांना दाखले वाटप व लहान मुलांच्या आरोग्य मोहिमेचा प्रारंभ अश्या संयुक्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरगुडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील होते. संजय गांधी निराधार योजनेच्या ४०० लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे वाटप, शालेय विद्यार्थ्यांना उत्पन्नाच्या दाखल्यांचे वाटप व आरोग्यसेवा योजनेचा प्रारंभ झाला.
भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, महाराष्ट्र राज्य सरकारच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत एक दिवसापासून १८ वर्षापर्यंतच्या लहान मुलांसाठी ही मोफत आरोग्य तपासणी, शस्त्रक्रिया व औषधोपचार मोहीम राबविली जाणार आहे. लहान गावांमध्ये संपूर्ण एक दिवस व मोठ्या गावांमध्ये दोन दिवस ही मोहीम राबविली जाणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये मेंदूचे आजार, दुभंगलेले ओठ व टाळू, हाडांचे आजार, डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू व तिरळेपणा, ऐकू न येणे, हृदयशस्त्रक्रिया, दात किडणे व काढणे या आजारासंबंधित तपासण्या, शस्त्रक्रिया व उपचारही मोफत केले जाणार आहेत.
मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, जागतिक पातळीवर महिलांच्या गर्भाचे आणि स्तनांच्या कॅन्सरवरील लसीचे संशोधन झाले आहे. लग्नापुर्वी नऊ वर्ष आधी ही लस दिल्यास महिलांना गर्भाचे आणि स्तनांचे कॅन्सर होणार नाहीत, असे या अभ्यासातून पुढे आले आहे. या लसीच्या एका डोसची किंमत साडेसात हजार रुपये आहे. या लस पुरवठ्यासाठीही सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. पहिला टप्पा निम्म्यावर पोहोचल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात कॅन्सर तपासणीही मोफत केली जाणार आहे.भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, निराधार योजनेची पेन्शन जास्तीत जास्त गोरगरिबांपर्यंत पोहचेल यासाठी लागू असलेली वार्षिक वीस हजार रुपये उत्पन्न मर्यादेची अट पन्नास हजार रुपये करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच लाभार्थीची मुले मोठी झाल्यानंतर बंद होणारी पेन्शनची अट काढून टाकावी लागेल आणि एक हजार रुपये पेन्शन दोन हजार रुपये करणारच.
“त्यांची काय चूक….?”
ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ भाषणात म्हणाले, विधवा संबंधातील कुप्रथा बंद करण्याचे परिपत्रक शासनाने काढले आहे. ही गोष्ट पुरोगामी, परिवर्तनवादी व प्रबोधनवादी आहे. पतीचा मृत्यू झाल्यानंतर विधवा झालेल्या माता- भगिनींचे कुंकू पुसले जाते. बांगड्या फोडल्या जातात, दागिने काढले जातात. समाजात मान -सन्मान मिळत नाही. शुभकार्याला बोलावले जात नाही. यामध्ये त्यांची काय चूक आहे? असे म्हणताच उपस्थित महिलांच्या डोळ्यात आश्रू तरळले.
‘अशुभ नाव……..”
भाषणात केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांनी समरजितसिंह घाटगे यांच्यावर जोरदार टीका केली. याचा संदर्भ घेत मंत्री मुश्रीफ आपल्या भाषणात म्हणाले, वास्तविक गोरगरिबांची सेवा, त्यांच्या कल्याणाच्या विविध योजना राबविताना मला २४ तासांचा दिवस अपुरा पडतोय. खरंतर एवढ्या चांगल्या कार्यक्रमात अशी अशुभ नावं घ्यायला नको होती.यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक व संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष प्रताप उर्फ भैय्या माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, ॲस्टर आधारच्या जनसंपर्क अधिकारी सौ. आयेशा राऊत यांची मनोगते झाली.व्यासपीठावर मुरगुडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, बिद्री साखरचे संचालक प्रवीणसिंह भोसले, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन व गोकुळचे संचालक नविद मुश्रीफ, दलितमित्र बळवंतराव माने, सदाशिव तुकान, राजू आमते, नारायण पाटील, नेताजी मोरे, बाळासाहेब दाईंगडे, डॉ.सुनिता पाटील, प्रवीण काळबर, संजय चितारी, डॉ.अभिजीत शिंदे, दत्ता पाटील, सुर्याजी घोरपडे, राजु माने आदी प्रमुख उपस्थित होते.स्वागत कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विकास पाटील यांनी केले. सूत्रसंचालन निशांत जाधव यांनी केले. आभार सातापा कांबळे यांनी मानले.