चालणे होणार डौलदार, व्यक्तिमत्व बनेल रुबाबदार
कोल्हापूर दि.१३ (राजेश कदम ): ‘चप्पल लाईन’ येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘कोल्हापूरी चप्पल प्रदर्शन व विक्रीच्या’ माध्यमातून दिनांक १३ ते १५ मे रोजी सर्व शाहू प्रेमींना कोल्हापुरी चप्पलेच्या कलाकुसरीचे प्रकार अनुभवता पाहता व विकत घेता येणार आहेत.कोल्हापूरकरांच्या भारदस्तपणाला आणखी रांगडेबाज बनवते ती कोल्हापुरी चप्पल, डोक्याला कोल्हापुरी फेटा आणि पायात कोल्हापुरी चप्पल असली की समजायचं की गडी कोल्हापूरचा हाय . कोल्हापुरी चप्पलचे वैशिष्ट्य म्हणजे ही चप्पल हाताने बांधली जाते. त्यासाठी चप्पलचा अंगठा, करंगळीची वादी, वरचा बेल्ट याच्या अचूक बांधणीसाठी लेदरच्या सोलवर माप टाकून त्यानंतर पुढील कामे केली जातात. चप्पल बनवताना कलाकुसरीचे काम नजाकतपणे करावे लागते. बेल्टवरील जरीकाम, रेखीव वेण्या तसेच तळावरील नक्षीकाम हे खूप बारकाईने करावे लागते. हे नक्षीकाम करताना एकमेकांमध्ये समान अंतर राहील याची काळजी चप्पल बनविणाऱ्या करागिराला घ्यावी लागते. कोल्हापुरी चप्पल बनवण्याचे हेच कसब, कौशल्य इथल्या मातीत सुभाषनगर या भागात विकसित झाले.हा पूर्ण भाग कोल्हापूरी चप्पल बनविण्यात तरबेज आहे घरातील लहानांपासून मोठ्या व्यक्ती व महिलाही मन लावून हे चप्पल बनविण्याचे काम करत असतात.आणि यातूनच विकसित झाला ‘कोल्हापुरी चप्पल’ नावाचा ब्रँड. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या राजाश्रयाने नावारूपास आलेल्या कोल्हापूरच्या चप्पलचे विविध प्रकार आणि कलाकुसर हे या चप्पल महोत्सवाच्या माध्यमातून पाहायला आणि खरेदी करायला मिळणार आहेत आणि हे चप्पल खरेदी विसरु नका.