छ .शाहू महाराजांच्या कलेचा वारसा वृद्धींगत व्हावा – जिल्हाधिकारी राहूल रेखावार
कोल्हापूर/प्रतिनिधी : छ . शाहू महाराज हे द्रष्टे राजे होते . त्यांनी वेगवेगळ्या कलांना , कलावंताना प्रोत्साहन दिले . छ . शाहू महाराजांच्या कलेचा वारसा अधिकाधिक वृद्धींगत व्हावा अशी अपेक्षा जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी व्यक्त केली .लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त जिल्हा प्रशासनामार्फत कसबा बावडा येथे आयोजित करण्यात आलेल्या, ‘ राजर्षी शाहू गाथा व वारसा समृद्ध कलेचा ‘ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ .ऋतूराज पाटील उपस्थित होते .
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले , छ . शाहू महाराज हे कलेचे , कलावंताचे भोक्ते होते . त्यांनी विविध कलेला आणि कलावंतांना आश्रय दिला तसेच शाहू महाराजांच्या जीवनावरील काही प्रसंगाचे सादरीकरण करणाऱ्या कलावंतांचे दिलखुलास कौतुक केले. तर आ. पाटील म्हणाले, या कृतज्ञता पर्वाद्वारे खऱ्या अर्थाने शाहू महाराजांच्या कार्याला उजाळा मिळतो आहे .हा उपक्रम यशस्वी व्हावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे मोलाचे योगदान आहे असे कौतुकोउद्गगार त्यांनी यावेळी काढले .
प्रारंभी शाहीर रंगराव पाटील यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनावर आधारीत पोवाडा सादर करीत शाहू महाराजांच्या जीवनातील काही प्रसंग हळूवारपणाने , अलगद उघडत प्रेक्षकांसमोर सादर केले .त्यांच्या या सादरीकरणाला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडात दाद दिली . राजर्षी शाहू गाथा या उपक्रमांतर्गंत, महाराजांच्या जीवनावरील काही प्रसंगाचे सादरीकरण सार्थक फाऊंडेशन यांनी तर भालकर अकॅडमीने महाराजांचा वारसा समृद्ध कलेचा या उपक्रमांतर्गत गीत, नृत्य आणि पोवाडा सादर केला .कसबा बावड्यातील श्रीराम सोसायटी हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमामध्ये ,स्वाती यवलूजे, माधुरी लाड, प्रा. महादेव नरके, संतोष पाटील, सागर बगाडे , यांच्यासह अनेक शाहू प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .