राष्ट्रवादी परिसंवाद यात्रेची २३ ला कोल्हापुरात सांगता
कोल्हापूर/प्रतिनिधी : पक्षवाढीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रात परिसंवाद यात्रा सुरू केली आहे की यात्रा २० एप्रिलला कोल्हापूर जिल्ह्यात येत असून, तीन दिवस प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सभा होणार असून, त्यानंतर २३ एप्रिलला कोल्हापुरात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगत होणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील यांनी दिली आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले असले तरी स्थानिक पातळीवर पक्ष मजबूतिच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर परिसंवाद यात्रा सुरू केली आहे. महाराष्ट्रभर फिरून २० एप्रिलला ही यात्रा कोल्हापुरात येणार असून साडेबारा ते दुपारी तीन वाजता शिरोळ विधानसभा मतदारसंघात सभा होणार आहे. त्यानंतर इचलकरंजी हातकणंगले मतदारसंघात यात्रा जाणार आहे.
२१ एप्रिलला सकाळी साडेनऊ वाजता शाहूवाडी त्यानंतर कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण व सायंकाळी करवीर विधानसभा मतदारसंघाची सभा होणार आहे. २२ एप्रिलला चंदगड,राधानगरी व कागल मतदार संघात सभा होऊन २३ एप्रिलला शाहू मैदान किंवा गांधी मैदानात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सांगता सभा होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील यांनी दिली आहे.