डॅमेज कंट्रोलसाठी शरद पवार यांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट – विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर
कोल्हापूर/प्रतिनिधी : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राजकारणात उत्तम प्रकारे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ओळखले जातात. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरील ‘ईडी’च्या कारवाईनंतर शरद पवार यांनी याच उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असावी, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली.शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्लीत भेट घेतली. त्यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सांगितले की, केंद्रीय तपास यंत्रणांचा जो ससेमिरा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे लागला आहे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काही मंत्री सध्या जेलमध्ये आहेत. शिवसेनेच्या नेत्यांवर ईडीच्या धाडी पडल्या आहेत, त्यासंदर्भात ही भेट झाली असावी.
केंद्रीय तपास यंत्रणा श्रीधर पाटणकर यांच्या माध्यमातून मातोश्रीच्या दारापर्यंत पोहोचल्या आहेत. संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत. पण ते राष्ट्रवादी काँग्रेसचे दूत आणि शरद पवार यांचे भक्त आहेत. या सर्व कारवाईचे गांभीर्य लक्षात घेऊन या तपास यंत्रणांच्या ससेमिरासंदर्भात ही भेट असू शकते. तसेच संजय राऊत यांच्यावरील कारवाईनंतर हे सगळे कुठेतरी आपल्यापर्यंत पोहोचलंय, याची जाणीव शरद पवार यांनी झाली असेल. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीमध्ये शरद पवार यांचा राजकीय तडजोडीचा उद्देश असू शकतो. शेवटी शरद पवार हे राजकीय डॅमेज कंट्रोलमध्ये माहीर आहेत, हे महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला माहीत आहे, मग तो भूकंप असो वा कुठली आपत्ती आल्यास त्याचे निवारण करण्यामध्ये त्यांचे कौशल्य आहे, असेही दरेकर यांनी सांगितले.शरद पवार यांच्या आजच्या भेटीला मी काही गांभीर्याने पाहत नाही. पवार हे एक खासदार व पक्षाचे प्रमुख म्हणून पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊ शकतात. परंतु या भेटीचा अर्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपा एकत्र येणार असा लावण्याचा काही आवश्यकता नाही.काल रात्री दिल्लीमध्ये पवार यांच्या निवासस्थानी जे स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते. पण त्यामध्ये काही राजकीय गुपिते दडली असावीत असे मला वाटत नाही. राज्यामध्ये विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या काळात असे चहापान आयोजित करण्यात येत असते, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
राजकीय संस्कृतीचे एका बाजूला गुणगान गायचे व दुस-या बाजूला विरोधकांवर टीका करताना असभ्य व खालच्या पातळीवर भाषा वापरायाची हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाही. अखेर कुठल्या अतिरेकाचा शेवट होत असतो, अशी टीकाही दरेकर यांनी संजय राऊत यांच्यावर केली.