२३ व २४ च्या संपात प्राथमिक शिक्षक समिती सहभागी होणार
कोल्हापूर /प्रतिनिधी : २३ आणि २४ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय राज्यव्यापी लाक्षणिक संप राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीने पुकारलेला आहे. या संपामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ही शिक्षकांच्या अनेक प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी राज्यपातळीवर नेहमीप्रमाणे सहभागी आहे .गेली अनेक वर्षे शिक्षक व शिक्षणा संबंधाने अनेक मागण्या प्रलंबित आहेत .यामध्ये सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी ,शिक्षण सेवक पद बंद करून नियमित शिक्षक नेमावेत, सध्याच्या शिक्षण सेवकांचे मासिक मानधन किमान पंचवीस हजार रुपये करावे, शिक्षकांना आश्वासित प्रगती योजना लागू करावी, केंद्राप्रमाणेच सर्व भत्ते लागू करावेत, नगरपालिका- महानगरपालिका शिक्षकांना शंभर टक्के वेतन अनुदान द्यावे, नगरपालिका- महानगरपालिका शिक्षकांच्या पेन्शन संदर्भात प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लागावा, अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे नगरपालिका महानगरपालिका शिक्षकांना सेवेचे लाभ द्यावेत, अप्रशिक्षित शिक्षण सेवक कालावधी वरिष्ठ वेतन श्रेणी सह अन्य सर्व प्रकारच्या कामासाठी ग्राह्य धरावा, महिला कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे बाल संगोपन रजा मिळावी, उच्च शैक्षणिक अहर्ता धारण करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना सेवा वर्ग १ व २ मध्ये पदोन्नती द्यावी ,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा मधील सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व लेखन साहित्य मिळावे, शिष्यवृत्ती परीक्षेचे वाढवलेले शुल्क रद्द करावे ,शिक्षकांना कोणत्याही प्रकारची निवडणुकी सह अन्य अशैक्षणिक कामे देऊ नयेत, विषय पदवीधर शिक्षकांना विनाअट पदवीधर वेतनश्रेणी मिळावी या व अन्य मागण्यासाठी हा संप असून या संपामध्ये सर्व प्राथमिक शिक्षकांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे नगरपालिका महानगरपालिका प्रमुख सुधाकर सावंत, राज्य उपाध्यक्ष उमेश देसाई, शहराध्यक्ष संजय पाटील सरचिटणीस संजय कडगावे यांनी केले आहे .यावेळी उत्तम कुंभार,वसंत आडके, नयना बडकस ,आशालता कांजर, सरिता सुतार, शकुंतला मोरे, सुभाष धादवड ,मयूर जाधव, उत्तम गुरव आदी उपस्थित होते