कार्यकारिणीला नेहमीच पाठबळ देऊ -जितेंद्र राठोड, जितो लेडिज विंगचे पदग्रहण
कोल्हापूर : जितो लेडिज विंग कार्यकारिणीला नेहमीच पाठबळ देऊ, असे प्रतिपादन जितो अध्यक्ष जितेंद्र राठोड यांनी केले. येथील जितो चॅप्टरच्या लेडिज विंगचा पदग्रहण व शपथविधी सभारंभ नुकताच रेसिडेन्सी क्लब येथे झाला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. दीपप्रज्वलन व नवकार मंत्राने कार्यक्रमाची सुरवात होऊन श्री. राठोड यांनी स्वागत केले. ते म्हणाले, जितोच्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शिवाय व्यापार वद्धी, प्रशासनिक सेवा, स्पर्धा परीक्षा, स्टार्टअपमधील गुंतवणूक, खेळ याविषयीही मान्यवरांच्या ज्ञानाचा लाभ करून दिला.
महिलांनी आर्थिक व सामाजिक क्षेत्रात पुढे येऊन त्यांचे सक्षमीकरण होणे गरजेचे असल्याचे मत कार्यक्रमाच्या अध्यक्ष, समन्वयक सौ. संगीता ललवाणी यांनी व्यक्त केले. अपेक्स संचालक सौ. तृप्ती कर्नावट यांनी जीतो लेडिज विंगमध्ये अधिकाधिक महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. सचिव गिरीश शहा यांनी जितो कोल्हापूरच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याची माहिती दिली. ते म्हणाले, २०१९ च्या पुरात २५०० कुटुंबीयांना संसारोपयोगी साहित्य दिले. कोरोनाच्या लाटेमध्ये एन ९५ मास्क, पीपीई कीट वितरणाबरोबर दररोज २५० पोलिस बांधवांसाठी जेवणाची व्यवस्था केली. २०२१ च्या महापुरात निवारा केंद्रातील जनावरांसाठी पशुखाद्यासोबत चाऱ्याचे वितरण केले. चॅप्टरच्या माध्यमातून महिला विंगला सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल.
नूतन अध्यक्ष श्रेया गांधी म्हणाल्या, महिलांसाठी सक्षमीकरणाचे कार्यक्रम राबविण्याबरोबरच सभासद संख्या वाढविणे आणि संस्थेचा नावलौकिक वाढविण्याचा प्रयत्न करू. यावेळी उद्योगपती नेमचंद संघवी, राजीव परीख, जितूभाई गांधी, हर्षद दलाल, डॉ. शीतल पाटील, नगराध्यक्ष सौ. जयश्री गाट, रवी संघवी, शीतल गांधी, अमर गांधी यांच्यासह महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. आशा मणियार व शर्मिला शहा यांनी सूत्रसंचालन केले. स्वीटी पोरवाल यांनी आभार मानले.