गोकुळ’ च्या २०२२ दिनदर्शिकेचे प्रकाशन
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत २०२२ नवीन वर्षात ‘आपलं लक्ष्य वीस लक्ष’ २०२२ गोकुळ संदर्भित दिनदर्शिकेचे प्रकाशन संघाचे चेअरमन विश्वास पाटील (आबाजी) यांच्या हस्ते आणि माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरुण डोंगळे यांच्यासह संचालक व अधिकारी यांच्या उपस्थितीत संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयात करण्यात आले. या दिनदर्शिके मधून २०लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ठ पूर्ण करण्यासाठी जातिवंत जनावरांचे पालन पोषण, गोठा व्यवस्थापन,आहार संतुलन, महालक्ष्मी पशुखाद्य वापर ,जंत निर्मूलन व लसीकरण, प्राथमिक दूध संस्था व्यवस्थापन व संघाच्या विविध योजना या सर्व विषयावर प्रबोधनात्मक माहिती या दिनदर्शिकेत देण्यात आली आहे.
यावेळी बोलताना संघाचे चेअरमन विश्वास पाटील म्हणाले कि दरवर्षी वेगवेगळे विषय घेऊन दूध उत्पादकांचे व दूध संस्थाचे प्रबोधन होण्यासाठी गोकुळ आपली दिनदर्शिका प्रसिद्ध करीत असते. मागील सहा महिन्याच्या कालावधीत गोकुळच्या दूध संकलनात प्रतिदिनी सरासरी सुमारे ३ लाख लिटरहून अधिक दुधाची भर पडून संकलन १७ लाख लिटरपर्यंत पोहचले आहे. मुंबई, पुण्यासह राज्याच्या विविध भागातून गोकुळ दूध आणि दुग्धजन्य पदार्थ उत्पादनांना ग्राहकांची विशेष मागणी असून ती अधिकाधिक पूर्ण करता यावी यासाठीच अनेक प्रयत्नांपैकी प्रबोधनात्मक दिनदर्शिका हा एक भाग आहे. यातील दूध उत्पादक हाच सर्वात महत्त्वाचा घटक असल्याने त्याला केंद्रित ठेवूनच ही दिनदर्शिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. लवकरच दूध संस्थाना या दिनदर्शिकेचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
यावेळी मा.चेअरमनसो यांनी संघाचे अधिकारी,कर्मचारी,दूध उत्पादक,दूध संस्था,वितरक व ग्राहक तसेच दूध वाहतूक ठेकेदार यांना नवीन वर्षाच्या गोकुळ परिवारातर्फे शुभेच्छा दिल्या. यावेळी सूत्रसंचालन एम.पी.पाटील व आभार जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील यांनी मानले. या कार्यक्रमावेळी चेअरमन मा.श्री.विश्वास पाटील, जेष्ठ संचालक अरूण डोंगळे,संचालक बाबासाहेब चौगले,बयाजी शेळके, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले इतर अधिकारी व कर्मचारी आदि उपस्थित होते.