पाच हजाराची लाच स्वीकारणाऱ्या पोलिसाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली अटक
कोल्हापूर/प्रतिनिधी : पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या तक्रारदार आणि त्याच्या आईला अटक न करता थेट कोर्टात आरोपपत्र दाखल करुन त्यांना मदत करण्यासाठी पाच हजाराची लाच स्वीकारणाऱ्या पोलिसाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. ही घटना इचलकरंजीतील शहापूर पोलिस ठाण्याच्या परिसरात झाली. पांडुरंग लक्ष्मण गुरव असे लाच घेणाऱ्या पोलिसाचे नाव आहे.
पोलिसांनी या गुन्ह्याची माहिती दिली. या गुन्ह्यातील तक्रारदार आणि त्यांच्या आईच्या विरोधात इचलकरंजीतील शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस नाईक पांडुरंग लक्ष्मण गुरव करत होते. या गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी पोलिस नाईक गुरव याने तक्रारदारांकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने नाईलाजस्तव एक हजार रुपये पोलिस गुरव याला दिले. त्यानंतर गुरव याने गुन्ह्यात तक्रारदार आणि त्याच्या आईला अटक न करता थेट दोषारोपपत्रासह कोर्टात हजर करुन त्यांना मदत करण्यासाठी चार हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
पोलिसांनी २८ डिसेंबर रोजी शहापूर पोलिस ठाण्यात सरकारी पंचासमक्ष तक्रारीची पडताळणी केली. यावेळी पोलिस गुरव याने यापूर्वी गुन्ह्यात मदत करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे मान्य करुन आणखी चार हजार लाचेची मागणी केली. त्यानुसार आज गुरुवारी ३० रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शहापूर कोरोची रस्त्यांवर सापळा लावला. पोलिसांनी तक्रारदारांकडून चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलिस नाईक पांडुरंग गुरव याला रंगेहाथ पकडले. पोलिस नाईक गुरव हा सध्या भुदरगड तालुक्यातील खानापूर येथे रहात असून त्याचे मूळ गाव राधानगरी तालुक्यातील पिरळ आहे. पोलिस उप अधीक्षक अदिनाश बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सतीश मोरे, सहाय्यक फौजदार संजीव बंबरगेकर, अजय चव्हाण, विकास माने, सुनील घोसाळकर, नवनाथ कदम, मयूर देसाई यांनी कारवाईत भाग घेतला