केडीसीसीमध्ये राजकीय पादत्राणे बाहेर काढून निरपेक्षपणे पारदर्शी कारभार केला – बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन
गडहिंग्लजमध्ये छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या प्रचार मेळाव्याला प्रतिसाद
गडहिंग्लज/प्रतिनिधी : सहकारी संस्थेत पक्षीय राजकारण नसले पाहिजे. त्यामुळेच, केडीसीसी बँकेत राजकीय पादत्राणे बाहेर काढून निरपेक्षपणे पारदर्शी कारभार केला, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. राजकारणाचा बरा-वाईट परिणाम हा शेतकऱ्यांवर होतो, असेही ते म्हणाले.गडहिंग्लजमध्ये गिजवणे रोडवरील सूर्या सांस्कृतिक हॉलमध्ये छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या प्रचार शुभारंभात मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. आघाडीच्या निवडणूक प्रचाराच्या तालुकानिहाय मेळाव्याचा शुभारंभ गडहिंग्लजमधून झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीची चंदगड तालुका अध्यक्ष रामाप्पा करीगार होते.मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, आज आमच्यासमोर जे विरोधक म्हणून उभे आहेत, मी त्यांच्यावर काहीही बोलणार नाही. त्यांना कोणतीही दुषणे देणार नाही. कारण; गेल्या सहा -साडेसहा वर्षात केलेला कारभार हा आम्ही त्यांच्यासह केलेला आहे. परंतु; अवघ्या एका जागेवर चर्चा सुरू असताना त्यांनी विरोधात आघाडी का निर्माण करावी, याचे कोडे आम्हाला आजही सुटलेले नाही. केडीसीसी बँक ही कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मातृसंस्था व जिल्ह्याच्या सहकाराची शिखर संस्था आहे. याच भावनेतूनच अगदी काल परवा गोकुळच्या निवडणुकीत एकमेकांचा गळा घोटायला उठलेलो आम्ही या निवडणुकीत पक्षीय भेदाभेद बाजूला ठेवून एकत्र आलो आहोत.आमदार विनय कोरे म्हणाले, सहा वर्षापूर्वी प्रशासक जाऊन आम्ही सत्तेवर आलो. त्यावेळी बँक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये होती. परंतु; बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसंगी कमीपणा पत्करून, कटूता घेऊन थकबाकीदारांच्या दारात ढोल ताशा घेऊन गेले. त्यामुळे बँक प्रगती पदावर पोहोचली आहे.आमदार राजेश पाटील म्हणाले, गेल्या सहा वर्षांच्या वाटचालीत पिडीसीसी बँकेने यशस्वीतेचे सर्वच आर्थिक निकष यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत.
माजी खासदार श्रीमती निवेदिता माने म्हणाल्या, सहा वर्षांपूर्वी उमेदवारी करण्यासाठी आम्ही शोधून आणलेले लोक मागच्या दाराने पळून जात होते. आज बँकेची झालेली एवढी प्रगती पाहूनच उमेदवारीसाठी रेलचेल वाढली आहे. माजी मंत्री व आमदार प्रकाशराव आवाडे म्हणाले, सबंध महाराष्ट्रात सहकार खऱ्या अर्थाने कोल्हापूर जिल्ह्यात रुजला आहे, वाढला आहे.माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे म्हणजे प्रत्येक सत्तेतला समान तिसरा हिस्सा मिळालाच पाहिजे, असा काहीजणांचा गैरसमज झालेला आहे.माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या रुपाने केडीसीसी बँक राज्यात अग्रगण्य ठरली आहे. सहकारात स्पर्धा नसावी, सहकारासाठी ते चांगलं नाही.
अमर चव्हाण म्हणाले, गोरगरीब सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी केडीसीसी बँक ही कल्पवृक्षासारखी आहे. त्याच्या शेतीसह दैनंदिन अर्थविषयक गरजा भागवण्यामध्ये केडीसीसी बँक नेहमीच अग्रस्थानी राहिली आहे.व्यासपीठावर माजी मंत्री भरमुआण्णा पाटील, ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष विश्वासराव पाटील, बँकेचे संचालक असिफ फरास, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, संग्रामसिंह कुपेकर, राहुल आवाडे, अमित गाताडे, राजु काझी आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. तसेच; यावेळी आमदार राजूबाबा आवळे, संतोष पाटील, मदन कारंडे, प्रदीप पाटील- भुयेकर, सौ. श्रुतिका काटकर, विजयसिंह माने, सौ. स्मिता गवळी आदी उमेदवार उपस्थित होते.स्वागत जिल्हा परिषद सदस्य सतीश पाटील -गिजवणेकर यांनी केले. प्रास्ताविक बँकेचे संचालक व उमेदवार प्रताप उर्फ भैय्या माने यांनी केले. उमेदवारांचा परिचय जयसिंग चव्हाण यांनी करून दिला.गडहिंग्लज – येथील सूर्या सांस्कृतिक हॉलमध्ये आयोजित छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या प्रचार मेळाव्यात उपस्थित मान्यवर, उमेदवार व प्रमुख नेतेमंडळी. मेळाव्यासाठी उपस्थित सभासद मतदार.