इंग्लिश मीडियम स्कूल असो.च्या १ जानेवारीपासून क्रीडा स्पर्धा जिल्ह्यातील २०० हून अधिक शाळांचा असणार सहभाग
कोल्हापूर/ प्रतिनिधी : इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन (इम्सा ) ही इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आधुनिक व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी कार्यरत असणारी संस्था चालक, प्राचार्य, शिक्षक, पालक व विद्यार्थी यांची संघटना असून या संघटनेमार्फत जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी १ जानेवारीपासून क्रिडा स्पर्धांचे आयेाजन केले आहे अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष गणेश नायकुडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गणेश नायकूडे म्हणाले, अत्याधुनिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे आणि जागतिक स्पर्धेला तोंड देणारा सक्षम विद्यार्थी घडविण्यासाठी महाराष्ट्र मध्ये पोषक शैक्षणिक वातावरण निर्माण करणे हे इम्साचे ध्येय आहे. इम्सा मार्फत शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी सातत्याने विविध उपक्रम आयोजित केले जातात. यामध्ये संस्थाचालक, प्रिन्सिपल व टीचर्स यांच्यासाठी विविध विषयांवर कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा, विज्ञान प्रदर्शन, सांस्कृतिक स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.
ते म्हणाले, लॉकडाऊनमध्ये विद्यार्थी शाळेत येऊ शकत नसल्याने संघटनेच्या सर्व शाळांनी ऑनलाइन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडला नाही. पण विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत येत नसल्याने त्यांना खेळाचे प्रशिक्षण देता आले नाही. यामुळे विद्यार्थ्यांच्या मध्ये व्यायामाचा अभाव निर्माण झाला आहे. यासाठी विद्यार्थ्यांना पुन्हा खेळाच्या मैदानावर सक्रिय करण्यासाठी इम्साच्या माध्यमातून विविध सांघिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल या व इतर सांघिक खेळांचा समावेश आहे, तर वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये स्केटिंग, कराटे, योगा, बुद्धिबळ, कॅरम व इतर खेळांचा समावेश आहे. या जिल्हास्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून २००हून अधिक शाळा सहभागी होत असून दिनांक २७ डिसेंबर पर्यंत शाळांचे नोंदणी करण चालू असणार आहे.
या स्पर्धेच्या पहिल्या सत्राचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे यांच्या हस्ते होणार असून यावेळी जिल्ह्यातील सर्व संस्थाचालक ही उपस्थित असणार आहेत. शनिवार, दिनांक १ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता या स्पर्धेचे उद्घाटन गुरुकुल कॅम्पस अब्दुललाट या ठिकाणी होणार आहे. असेही यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला संस्थापक महेश पोळ, कार्याध्यक्ष के डी पाटील, उपाध्यक्ष एन एन काझी, सचिव नितीन पाटील,सहसचिव विल्सन वासकर खजिनदार माणिक पाटील, क्रीडा समिती अध्यक्ष सचिन नाईक, शहराध्यक्ष अमर सरनाईक, जिल्हा कार्यकारणी सदस्य चंद्रकांत पाटील व संस्थाचालक उपस्थित होते.