गार्डन्स क्लबच्या ५१ व्या पुष्पप्रदर्शनाचे शानदार उद्घाटन गार्डन्स क्लबचे पुष्पप्रदर्शन पर्यावरण पूरक – आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे
कोल्हापूर/प्रतिनिधी: गार्डन्स क्लब कोल्हापूर आणि राजर्षी शाहू छत्रपती महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ५१ वे पुष्पप्रदर्शन कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होत आहे. हे पुष्पप्रदर्शन अतिशय पूरकरित्या भरवले गेले आहे. अशा प्रकारचे पुष्पप्रदर्शन मी पहिल्यांदाच पाहिले आहे. महापालिकेच्या उद्यानांमध्ये रोज गार्डन करण्यासाठी गार्डन्स क्लब व कृषी महाविद्यालयाने सहकार्य करावे अशी अपेक्षा डॉ.कादंबरी बलकवडे यांनी व्यक्त केली. प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. विशेष अतिथी म्हणून श्रीमती शांतादेवी पाटील व अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे कृषी सहयोगी अधिष्ठाता डॉ. उत्तम होले,डॉ.संग्राम धुमाळ उपस्थित होते. यावेळी ‘रोजेट’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन समारंभ,दिनदर्शिका व उद्यान स्पर्धांचा बक्षीस समारंभ संपन्न झाला. महापालिका एक पाऊल पुढे येत आहे तर गार्डन्स क्लब मागे हटणार नाही. महापालिका उद्यानांना नवीन उभारी देण्यासाठी आणि रोज गार्डनसाठी आम्ही नक्कीच सहकार्य करू.कारण रोज आणि गार्डन चे अतूट नाते आहे.असे अध्यक्षा कल्पना सावंत यांनी सांगितले. तत्पूर्वी सकाळी ७ ते ९ या वेळेत विविध प्रकारच्या फुलांच्या साधारण २० विभागातील ५५ स्पर्धामध्ये २०० स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये बोन्साय, झेंडू,जिरेनियम,फुलांची व पाकळ्यांची रांगोळी क्रोटॉन,कुंडीतील रोपे,गुलाब, दुरंगी,विविधरंगी गुलाब,फ्लोरिबंडा, ग्रॅडीफ्लोरा,कर्दळ,निशिगंध, बुके,गुलाबातील अनेक प्रकार, सॅलेड डेकोरेशन, कॅकटस,सूर्यफूल, झिनियार,लँडस्केप स्पर्धेतील रचना सर्वांना पाहण्यासाठी खुल्या करण्यात आल्या. दुपारी शॉर्टफिल्म स्पर्धेच्या निवड झालेल्या फिल्म दाखविण्यात आल्या. तर संध्याकाळी फ्लॉवर शोचे मुख्य आकर्षण असलेला फॅशन डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांचा ‘बोटॅनिक फॅशन शो’ आणि ‘मॅनी क्वीन डिस्प्ले स्पर्धा सर्वांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली. उद्यानाविषयी निगडित अनेक वस्तूंचे स्टॉल तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातील अतिशय कलात्मक मातीच्या वस्तू, टेराकोटा ज्वेलरी, हायड्रोफोनिक्स, सेंद्रिय खते, बागेसाठी उपयुक्त अशा अनेक विविध वस्तूंचे व खाद्यपदार्थांचे तसेच नर्सरीचे स्टॉल येथे पाहण्यासाठी व विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कार्यक्रमास उपाध्यक्ष शशिकांत कदम,सचिव पल्लवी कुलकर्णी, डॉ.धनश्री पाटील, शैला निकम,वर्षा वायचळ, सुभाषचंद्र अथणे, अशोक डुनुंग ,संगीता कोकितकर, दीपा भिंगार्डे आदि उपस्थित होते.सूत्रसंचालन सुप्रिया भस्मे यांनी केले.क्वीन ऑफ शो गुलाब किरमिजी महालक्ष्मी पशु खाद्य,किंग ऑफ शो गुलाब स्लॅडीएटर क्लास अण्णाभाऊ आजरा तालुका शेतकरी सहकारी सूत गिरणी लि आजरा