आनंद शिंदेंच्या आवाजात ‘एक नंबर’मधील ‘बाबूराव…’ गाणं संगीतरसिकांच्या भेटीला
कोल्हापूर/प्रतिनिधी : दिग्दर्शक-गायक-संगीतकार-गीतकार जोडीचं एखादं गाणं हिट झालं की रसिकांनाही पुन: पुन्हा त्यांचंच कॅाम्बिनेशन असलेल्या गाण्यांची ओढ लागते. मागील काही दिवसांपासून दिग्दर्शक मिलिंद कवडे ‘एक नंबर’ या आगामी मराठी चित्रपटामुळं लाइमलाईटमध्ये आहेत. मिलिंद यांच्या या चित्रपटातील ‘बाबूराव…’ हे गाणं आनंद शिंदे यांनी गायलं आहे. योगायोग म्हणजे या गाण्याचं लेखन जय अत्रेनं केलं असून संगीत वरुण लिखतेनं दिलं आहे. यापूर्वी ‘तुझी चिमणी उडाली भुर्रर्र…’ आणि ‘आपला हात जगन्नाथ…’ सारखी सुपरहिट गाणी देणारी ही चौकडी ‘बाबूराव…’ या गाण्याच्या निमित्तानं पुन्हा एकत्र आली असून हे गाणं नुकतंच संगीतप्रेमींच्या सेवेत रुजू झालं आहे. संजय छाब्रिया यांच्या एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटच्या माध्यमातून ‘एक नंबर’ या चित्रपटाचं संगीत रसिकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे.
११ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘एक नंबर’ या चित्रपटाची निर्मिती महेश शिवाजी धुमाळ, जितेंद्र शिवाजी धुमाळ आणि मिलिंद कवडे यांनी धुमाळ प्रोडक्शनच्या बॅनरखाली आऊट ऑफ द बॉक्स फिल्म्सच्या सहयोगानं केली आहे. ‘बाबूराव…’ हे गाणं प्रथमेश परब आणि माधुरी पवार यांच्यावर चित्रीत करण्यात आले असून राहुल संजीर यांनी कोरिओग्राफी केली आहे. झी युवा अप्सरा आलीची विनर असलेल्या माधुरीनं आजवर बऱ्याच मालिका आणि चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. डान्सर, टिकटॅाक स्टार आणि सोशल मीडिया एन्फ्लुएन्झर अशीही तिची एक वेगळी ओळख आहे. सर्व नृत्य प्रकारांमध्ये पारंगत असलेल्या माधुरीची जोडी या गाण्यात प्रथमेशसोबत जमल्यानं ‘एक नंबर’मधील या गाण्याला नव्या जोडीचा तडका मिळाल्याचं पहायला मिळणार आहे.
‘बाबूराव…’ या गाण्याबाबत मिलिंद कवडे म्हणाले की, आनंद शिंदे यांच्या आवाजाचा चाहतावर्ग जगभर पसरला आहे. त्यांच्या आवाजावर प्रेम करणारे असंख्य चाहते ‘बाबूराव…’ हे गाणंसुद्धा डोक्यावर घेतील. आनंद शिंदे यांच्या आवाजाची जादू संपूर्ण जगानं अनुभवली आहे. ‘एक नंबर’मधील ‘बाबूराव…’ या गाण्याच्या निमित्तानं त्यांच्या आवाजातील एक वेगळा बाज अनुभवायला मिळणार आहे. वरुण लिखतेनं सुरेख संगीत दिलं असून, जय अत्रेनं सुंदर गीतरचना केली आहे. चित्रपटात हे गाणं पाहताना रसिक थिएटरमध्येच नाचायला लागतील याची पूर्ण खात्री असल्याचंही मिलिंद म्हणाले.
दिग्दर्शनासोबत ‘एक नंबर’ची कथा व पटकथा मिलिंद कवडे यांनीच लिहिली आहे. संवादलेखनाची बाजू संजय नवगिरे यांनी सांभाळली आहे. पुन्हा एकदा मिलिंद यांच्या ‘एक नंबर’मध्येही प्रथमेश परब मुख्य भूमिकेत असून, मिलिंद शिंदे, गणेश यादव, निशा परूळेकर, अभिलाषा पाटील, आयली घिया, ऋषिकेश धामापूरकर, अक्षता पाडगावकर, प्रणाली संघमित्रा ढावरे, सुमित भोक्से, सुनिल मगरे, हरिष थोरात, आकाश कोळी आदी कलाकारही आहेत. पार्श्वसंगीत अभिनय जगताप यांनी दिलं आहे, संकलन प्रणव पटेल यांनी केलं आहे. डिओपी हजरत शेख (वली) यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, पटकथा सहाय्यक संजय नवगिरे आणि सुनिल मगरे आहेत.