ग्रामीण भागातील युवा उद्योजकांसाठी बीवायएसटी-एचडीएफसी बँक नर्चरिंग ग्राम्प्रेनुअर्स उपक्रम
कोल्हापूर,सांगली,सातारा जिल्ह्यात २०,००० युवकांपर्यंत पोहचण्याचे उद्दिष्ट
कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतीय युवा शक्ती ट्रस्ट (बीवायएसटी) आणि एचडीएफसी बँक तर्फे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील तरुण नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने सुरु करत असलेल्या उपक्रमाची घोषणा २१ डिसेंबर २०२१ रोजी आयोजित व्हर्च्युअल कार्यक्रमात करण्यात आली. सांगली,सातारा,कोल्हापूर जिल्ह्यातील छोट्या नवउद्योजकांना प्रोत्साहन देत मार्गदर्शन करण्यासाठी बीवायएसटी आणि एचडीएफसी बँकेने यावर्षी सुरवातीला भागीदारी केली होती. पुढील तीन वर्षात या कार्यक्रमाद्वारे शहरी आणि ग्रामीण भागातील २०,००० युवकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. यामध्ये २००० महिला उद्योजकांचा समावेश असेल. या युवकांच्या नवकल्पनांचे मूल्यांकन तज्ञांद्वारे केले जाईल. बीवायएसटी चे मार्गदर्शक तज्ञ् ५०० अशा नवउद्योजकांना त्यांचे व्यवसाय स्थापित करण्यासाठी व इतर बाबींमध्ये मदत करतील.या प्रकल्पाद्वारे बीवायएसटी मेंटरींग इंडिया प्रोग्रॅम अंतर्गत ३०० मार्गदर्शक जोडले जातील.
बीवायएसटी-एचडीएफसी बँक नर्चरिंग ग्राम्प्रेनुअर्स च्या उदघाटन प्रसंगी महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री नवाब मलिक,कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा (आयएएस), एचडीएफसी बँकेच्या सीएसआर विभागाचे प्रमुख नुसरत पठाण, बीवायएसटी चे संस्थापक व व्यवस्थापकीय विश्वस्त लक्ष्मी वेंकटेशन, बीवायएसटी चे अध्यक्ष सुबोध भार्गवा, बीवायएसटीच्या नॅशनल अॅडव्हायझरी ग्रुपचे अध्यक्ष सीपी त्रिपाठी आदी मान्यवर उपस्थित होते.
या व्हर्च्युअल कार्यक्रमाची सुरूवात बीवायएसटी मेंटरिंग इंडिया प्रोग्राम अंतर्गत मार्गदर्शन मिळालेल्या औरंगाबाद आणि पुण्यातील तीन उद्योजकांच्या यशोेगाथांच्या सादरीकरणाने झाली.या कार्यक्रमात पुण्यातील उद्योजिका व यंग आंत्रप्रेन्युअर ऑफ द ईयर पुरस्कार विजेत्या अमृता मांगले यांचा सत्कार करण्यात आला.त्यानंतर मेंटरिंग इंडिया या बीवायएसटीच्या उपक्रमाअंतर्गत नवीन मार्गदर्शक (मेंटर्स) ओळखून त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी बीवायएसटी कोल्हापूरच्या स्ट्रॅटेजिक कमिटीच्या अध्यक्ष पल्लवी कोरगावकर आणि डीवाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅन्ड टेक्नोलॉजीच्या अधिष्ठाता डॉ.क्षमा कुल्हाल यांनी सामंजस्य करारावर सह्या केल्या.यानंतर बीवायएसटी बिझनेस आयडिया काँटेस्टचा फ्लॅग ऑफ करण्यात आला.