करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात पूजेच्या ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचे सुरक्षायंत्रणासह भाविकांची तारांबळ उडवणाऱ्या जावयासह सासर्याला अटक
कोल्हापूर/प्रतिनिधी : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात पूजेच्या ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचे सांगून सुरक्षायंत्रणासह भाविकांची तारांबळ उडवणाऱ्या जावयासह सासर्याला दहशतवाद विरोध पथक (एटीएस) व एलसीबीने शुक्रवारी शिताफीने ताब्यात घेतले. जावई सुरेश लोंढे(रा.बागणी जि सांगली) आणि सासरा बाळासाहेब कुरणे (वय.६०) राहणार लाटवडे ता.हातकणंगले जिल्हा कोल्हापूर अशी त्यांची नावे आहेत.
दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे त्यांनी सांगितले नवरात्र उत्सवाला काल गुरुवार पासून प्रारंभ झाला उत्सवाच्या पहिल्याच दिवशी सायंकाळी साडेचारच्या सुमाराला या दोघांनी करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती पणजी गोवा येथील पोलीस मुख्यालयात दिली गोवा पोलिसांनी तातडीने कोल्हापूर पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली.
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्यासह अधिकारी आणि पोलिसांचा मोठा ताफा मंदिर आवारात दाखल झाला भाविकांना कर्मचाऱ्यांना सूचना देऊन युद्धस्तरावर तपासणी मोहीम राबवली मात्र मंदिर परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नसल्याने हा अफवेचा प्रकार असल्याचे पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले होते.
मात्र, नवरात्र उत्सव काळात पोलीस नियंत्रण कक्षाला खोटी माहिती देऊन यंत्रणेची तारांबळ उडवणाऱ्या संशयिताचा शोध घेण्याचे आदेश बलकवडे यांनी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार मोबाईल लोकेशन द्वारे या दोघांचा छडा लावण्यात आला. पोलिसांची चार पथके सांगली जिल्ह्यात तैनात करण्यात आली होती.आज शुक्रवारी सकाळी या दोघांना ताब्यात घेण्यात आले.त्यांची कसून चौकशी सुरू असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक प्रमोद जाधव आणि जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी सांगितले.