वारणा कापशी येथील आरव केसरे या पाच वर्षीय बालकांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश बापानेच केला मुलाचा खून
कोल्हापूर/प्रतिनिधी : शाहूवाडी तालुक्यातील वारणा कापशी येथील आरव केसरे या पाच वर्षीय बालकांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात पोलिसांना बुधवारी यश आले आहे.पत्नीचे परपुरुषाशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून आरोपीचा पत्नीशी सतत वाद होत होता. याच रागातून जन्मदात्या पित्यानेच स्वतःच्या मुलाचा गळा आवळून खून केल्याच निष्पन्न झाले असून या प्रकरणी आरवचे वडील राकेश केसरे याला ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे. शाहूवाडी तालुक्यातील वारणा कापशी येथील आरव केसरे हा पाच वर्षाचा मुलगा रविवार सायंकाळ पासून बेपत्ता झाला होता.आरवचे वडील राकेश केसरे यांने मुलगा बेपत्ता झाल्याची फिर्याद शाहूवाडी पोलिसात दिली होती. यानंतर पोलिस आणि ग्रामस्थांनी मिळून परिसरात याचा शोध घेतला होता. मात्र तो मिळून आला नव्हता. मंगळवारी सकाळी आरवचा मृतदेह त्यांच्या घराजवळच आढळून आला. आरवच्या मृतदेहावर हळद-कुंकू टाकण्यात आल्यामुळे हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय सुरुवातीला वर्तविण्यात येत होता. मात्र श्वान त्याच्या घराजवळच घुटमळत राहिल्याने पोलिसांनी आरवच्या दहा ते पंधरा नातेवाईकांची कसून चौकशी केली. कमालीची गोपनीयता बाळगत पोलिसांनी केलेल्या तपासात आरवचा खून त्याच्या वडिलांनी केल्याचे तपासात पुढे आले आहे. पत्नीचे अनैतिक संबंध असून आरव हा आपला मुलगा नसून परपुरुषाचा आहे, असा समज करून वारंवार आरोपी राकेश केसरे पत्नीशी सतत वाद घालत होता. यातूनच आरोपीने रागाच्या भरात केलेल्या मारहाणीत आरव बेशुद्ध पडल्यामुळे त्याच्या जन्मदात्या पित्यानेच गळा दाबून त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. वडील राकेश रंगराव केसरे याने तशी कबुली दिली असून शाहूवाडी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे. या पत्रकार बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे,पोलीस उपाधीक्षक रवींद्र साळुंखे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, शशिराज पाटोळे, प्रसाद कोळपे यांच्यासह पोलिस अधिकारी उपस्थित होते.राकेश केसरे यास न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.