शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ पहिल्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाई देवीची ब्रह्माणी रुपात पूजा
कोल्हापूर/प्रतिनिधी : शारदीय नवरात्रोत्सवास आज ७ तारखेपासून प्रारंभ झालेला आहे.गेली २ वर्षे कोरोनामुळे बंद असलेली मंदिरे आज नवरात्रीच्या निमित्ताने सुरू करण्यात आली. नवरात्रोत्सवाच्या आजच्या पहिल्या दिवशी करवीरनिवासिनी अंबाबाई देवीची ब्रह्माणी रुपात पूजा बांधण्यात आली होती. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मंदिराची फुलांनी, फळांनी सजावट केली आहे.पहाटे चार वाजता मंदिर उघडल्यावर नित्यनियमाने देवीची काकड आरतीची पूजा झाली. त्यानंतर सकाळी साडेआठ वाजता घटस्थापना झाल्यावर मानाची तोफ उडवून घट बसवण्याची वर्दी देण्यात आली. त्यानंतर शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात झाली.
मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून मंदिराच्या गाभारा आणि मंडपात आकर्षक फुले आणि फळांची आरास केली गेली आहे. मंदिरात प्रसन्न वातावरणामुळे आणि गर्दी नसल्याने भाविकांना व्यवस्थित दर्शन मिळत आहे.पहाटे पाच वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग केलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. बुकींग केलेल्याची खात्री करुन भाविकांना मास्क तोंडाला लावून आणि सॅनिटायझर लावून सोडण्यात आले.
घंटा चौकात भाविक मनोभावे नतमस्तक होत असल्याचे चित्र पहायला मिळाले. ऑनलाईन बुकींग न केलेल्या भाविकांना महाद्वारातून मुख दर्शनाची सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत.
आजची पूजा व अर्थ – ब्रह्माणी मातृका
ब्राह्मी माहेश्वरी चैव कौमारी वैष्णवी तथा
वाराही च इंद्राणी चामुडा: सप्तमातराः
मातृका देवता या जल मातृका, स्थल मातृका इत्यादी प्रकारच्या आहेत. या मातृकांची विवाहादी मंगल कार्यामध्ये समूहामध्ये पूजन केले जाते. यांना सप्तमातृका म्हणतात.या विविध देवतांच्या शक्ती रूपी तत्व देवता अहित. याचे वर्णन सप्तशती ग्रंथामध्ये आहे. असुरांच्या वधावेळी विविध देवतांनी आपापली शक्ती वापरून या देवतांना निर्माण केले.
ज्या देवाचे जे रूप आहे भूषण, वाहन, शस्त्रे, अलंकार आहेत, तशाच रूपामध्ये फक्त स्त्री रूपात, देवता असुरांशी युदध करण्यासाठी आल्या. आज प्रथम मातृका ब्रह्माणी | ब्राह्मी या रूपात श्री महालक्ष्मी – अंबाबाईची पुजा बांधण्यात आली आहे.ब्रम्हाणी ही ब्रम्हदेवाची शक्ती आहे. ही चार मुख असणारी व चर्तुभूज आहे, तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये अपमाळ, कमंडलू, पुस्तक, घंटा आहे. तिचे वाहन हंस आहे. ब्राह्मी स्वर्ण समाध्येया मृगचर्म विभूषीता, अक्षमालाभये दण्डकुण्डिक दधतो करे :
ही पूजा श्रीपूजक चेतन चौधरी व लाभेश मुनिश्वर यांनी बांधली