वीज बिलाची वसुली समंजसपणाने करा : आमदार चंद्रकांत जाधव
वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना : थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडीत करू नका
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोरोनाच्या महामारीमुळे सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक आर्थिक अडचणीत आहेत. अशा परिस्थितीमध्ये वीज वितरण कंपनीने सहकार्याची भूमिका घेत, समंजसपणाने वीज बिलाची वसुली करावी ; मात्र थकबाकीदार वीज ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडीत करू नये अशा सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
कोल्हापूर शहरात वीज बिलांची सक्तीने वसुली सुरु असून, वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आमदार जाधव यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
आमदार जाधव म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या निर्बंधामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक सर्वचजण आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कोरोनामुळे सर्वांचेचे अर्थकारण बिघडले आहे. घर कसे चालवायचे अशा विवंचनेत असलेल्या नागरिकांना सरकारने आता निर्बध शिथील केल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.
वितरण कंपनी व ग्राहक यांचे नाते कायमस्वरूपीचे आहे. राज्यात वीज बील वसूलीचे प्रमाण कोल्हापूरात सर्वात चांगले असून, वीज गळती शुन्य आहे. कोल्हापूरातील सर्वच ग्राहक वीज बिल भरणार आहेत ; मात्र कोरोनामुळे नागरिक आर्थिक अडचणीत आहेत, त्यामुळे वीज बिल थकीत आहेत. अशा परिस्थितीत वीज बिलाची वसुली करताना काही अधिकारी व कर्मचारी यांची भाषा चुकीची आहे, हे बरोबर नाही. वितरण कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी संमजसपणाची भूमिका घेऊन, थकबाकीदार ग्राहकाशी चर्चेतून मार्ग काढावा. वीज बिलाचे सोयीस्कर हफ्ते करून द्यावेत ; मात्र ग्राहकाचा वीज पुरवठा खंडीत करू नये असे आवाहन आमदार जाधव यांनी केले.
वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता अंकुर कावळे म्हणाले, ग्राहकांशी सौजन्याने बोलण्याच्या सूचना सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात येतील, तसेच वीज बिलाबाबत कोणतीही तक्रार असल्यास विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा.
कार्यकारी अभियंता सुनिलकुमार माने उपस्थित होते.
—
चौकट
वीज हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. यामुळे वीज ग्राहकांच्या सर्व समस्यांचे निराकरण करून, त्यांचे समाधान करण्याची जबाबदारी वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची आहे. यामुळे प्रत्येक विभागीय कार्यालयात ग्राहक सुविधा केंद्र सुरु करावे व तेथे विद्युत वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे संपर्क नंबर द्यावेत अशी सूचना आमदार जाधव यांनी बैठकीत दिली.