भागिरथी महिला संस्थेच्या वतीने राधानगरी तालुक्यात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन, अडीचशेहून अधिक जणांनी घेतला लाभ
कोल्हापूर/प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्यांसाठी २१७ नाविन्यपूर्ण योजना सुरु केल्या आहेत. त्यामुळे शेतकर्यांचे जीवनमान निश्चितपणे उंचावले आहे. सर्वसामान्यांपर्यंत या योजना पोचवण्यासाठी तसेच महिला आणि मुलींच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी भागीरथी महिला संस्थेच्यावतीने ठिकठिकाणी मोफत आरोग्य शिबीरे घेतली जात आहेत. या शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांनी केले. फेजिवडे येथे घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
राधानगरी तालुक्यातील फेजिवडे येथे धनंजय महाडिक युवा शक्ती, भागीरथी महिला संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर आणि मोरया हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा अडीचशेहून अधिक व्यक्तींनी लाभ घेतला. सरपंच फारूक नावळेकर, तालुकाध्यक्ष संभाजी आरडे, दीपक शिरगावकर यांचा सौ. महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महामारीच्या काळात सर्वसामान्य व्यक्ती अनेक कारणांमुळे मेटाकुटीला आल्या आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. ही बाब जाणून घेवूनच, मोफत आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतल्याचे सौ. महाडिक यांनी नमूद केले. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची काळजी महिला घेत असतात. त्यामुळे महिला वर्गाच्या आरोग्याचे जतन करणे महत्वाचे आहे. केंद्र सरकारच्यावतीने शेतकरी आणि सर्वसामान्य व्यक्तींचं जीवनमान उंचावण्यासाठी आणलेल्या योजनांची माहिती पोचवण्याचं काम शिबिरांच्या माध्यमातून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. रोटरी क्लबच्या अध्यक्षा भारती नाईक यांनी महाडिक कुटुंबीयांच्या समाज कार्याबाबत विशेष कौतुक केले. यावेळी विजयराव महाडिक, मीरा कुलकर्णी, डॉ.सुभाष जाधव यांनी, धनंजय महाडिक युवा शक्ती आणि भागीरथी महिला संस्थेच्या कामाचा आढावा घेतला. शिबिराला डी. जी. चौगले, सुरेश पानखेकर, सुखदेव गुरव, प्रवीण आरडे, महेश निल्ले, अंकुश पाटील, दत्तात्रय पोखम,अंकुश तुरंबेकर, डॉ. आसावरी ठोंबरे, दीपक गुरव, दयानंद कांबळे, सुरज माने यांच्यासह मान्यवर आणि भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.