शिवाजी विद्यापीठातर्फे २ ऑक्टोबरला तुषार गांधी यांचे विशेष ऑनलाईन व्याख्यान
कोल्हापूर/प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठातर्फे येत्या २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांची जयंती व आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन यांचे औचित्य साधून महात्मा गांधी यांचे पणतू, ज्येष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांचे विशेष ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले आहे.
‘भारतीय स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी आणि महात्मा गांधी’ या विषयावर श्री. गांधी संवाद साधतील. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के असतील तर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील व कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर प्रमुख उपस्थित असतील.
शनिवार, दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने सकाळी १०.३० वाजता विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनात कुलगुरू डॉ. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्या हस्ते राष्ट्रपुरूषांच्या प्रतिमांना अभिवादनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर ११ वाजता विद्यापीठाच्या ‘शिव-वार्ता’ (https://www.youtube.com/c/ShivVarta) या वाहिनीवरून श्री. गांधी यांचे व्याख्यान प्रसारित करण्यात येईल. सर्व शिक्षक, विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गांधी अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ. भारती पाटील यांनी केले आहे.