केडीसीसी बँक पाच लाखापर्यंतचे पिककर्ज देणार बिनव्याजी – ८३ वी ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा
शेती पंपाच्या वीज थकबाकीदार शेतकऱ्यांसाठीही मध्यम मुदत कर्ज योजना
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पाच लाखापर्यंतचे पिक कर्ज शून्य टक्के व्याज दराने म्हणजेच बिनव्याजी देणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. असा निर्णय घेणारी सबंध देशातील ही पहिली आणि एकमेव बँक असल्याचेही ते म्हणाले.
बँकेच्या ८३ व्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानावरून मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते.शेती पंपाच्या विजबिल थकबाकीदार पाणीपुरवठा संस्था व शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने बँकेने महत्त्वपूर्ण धोरण घेतल्याचे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, विजबिल थकबाकीदारासाठी महावितरणने ५० टक्के सुटीचे धोरण याआधीच जाहीर केले आहे. अशा आर्थिक अडचणीत असलेल्या पाणीपुरवठा संस्था व शेतकऱ्यांसाठी उर्वरित पन्नास टक्के वीज बिलासाठी पाच वर्षांच्या मुदतीची मध्यम मुदत कर्ज योजना जाहीर केली. या कृषीसंजीवनी योजनेअंतर्गत शेतकऱ्याला उर्वरित पन्नास टक्के विजबिल भरण्यासाठी कर्ज दिले जाणार आहे.
गेल्या आर्थिक वर्षात १८ कोटी २२ लाख रुपये इन्कमटॅक्स भरून बँक इन्कमटॅक्स विभागाच्या कोल्हापूर परिक्षेत्रात बिगर कंपनी विभागात जास्त इन्कमटॅक्स भरण्यामध्ये प्रथम आल्याचे श्री. मुश्रीफ म्हणाले.
अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या भाषणातील इतर महत्त्वाचे मुद्दे/ हायलाईट्स असे.
अकाउंट्स विभाग –
संयुक्त व्यवसाय १२ हजार ८०० कोटीहून अधिक इन्कम टॅक्सच्या कोल्हापूर परिक्षेत्रात बिगर कंपनी विभागात जास्तीत जास्त इन्कम टॅक्स भरणारी संस्था म्हणून प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाने गौरव
मार्च २०२१ अखेर सात हजार, १४१ कोटींच्या ठेवी. सन २०२१-२०२२ साठी ९ हजार कोटींच्या ठेवीचे उद्दिष्ट –
वसूल भागभांडवल पोचले २२६ कोटींवर.२०१५ मध्ये १११ कोटींवर असलेले नेटवर्थ २०२१ मध्ये तब्बल ४७० कोटींवर पोहोचले.
प्रशासकाच्या काळातील १०३ कोटी रुपयांचा संचित तोटा भरून काढून बँक सरासरी दीडशे कोटी ढोबळ नफ्याच्या यशस्वी टप्प्यावर पोहोचली आहे.
केडीसीसी बँक जिल्ह्याच्या पतपुरवठा आराखड्यात नेहमीच अग्रस्थानी –
शेतकऱ्यांना करावयाच्या पिक कर्ज आराखड्यामध्ये आपल्या बँकेला १,३७२ कोटी रुपयांचा ईष्टाक दिला होता. तो पार करीत बँकेने २,३९० कोटी रुपये म्हणजे तब्बल १७४ टक्के ईष्टाक पूर्तता केलेली आहे. जिल्ह्याच्या एकूण ३,२९८ कोटी पिक कर्ज वितरणामध्ये एकट्या केडीसीसी बँकेचा वाटा तब्बल ७२ टक्के आहे. याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे.
शेतकऱ्यांना पाच लाखांपर्यंत कर्ज बिनव्याजी –
सबंध कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचे पिक कर्ज शून्य टक्के व्याजदराने म्हणजेच बिनव्याजी देण्याचा महत्वपूर्ण व ऐतिहासिक निर्णय केडीसीसी बँकेने घेतला आहे. पाच लाखांपर्यंतचे पिककर्ज बिनव्याजी देणारी केडीसीसी ही महाराष्ट्रासह बहुदा देशातील पहिली आणि एकमेव बँक ठरेल.
शेतकऱ्यांना अपघाती विमा सुरक्षा –
शेतात काम करताना अगर अन्य कारणाने शेतकऱ्यांचे अपघात सरास होत असतात. अशा परिस्थितीत त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळावा, या भावनेने शेतकरी अपघाती विमासुरक्षा योजना प्रभावीपणे राबविली. किसान क्रेडिट कार्डधारक २ लाख ५२ हजार ३७१ शेतकऱ्यांना बँकेने स्वतःच्या नफ्यातून विमा हप्ता रक्कम देऊन ही योजना लागू केली आहे.
किसान सहाय्य कर्जमर्यादा वाढ –
किसान सहाय्य योजनेअंतर्गत प्रति हेक्टरी बागायती क्षेत्रासाठी २ लाखावरून अडीच लाख, तर जिरायती क्षेत्रासाठी १ लाखावरून दीड लाख अशी कर्जमर्यादा वाढ केली.
बँकेतच मिळताहेत ७/१२, ८ अ व गाव नमुना उतारे.
शेतकऱ्यांना कर्ज प्रकरणासाठी विनाविलंब दस्तऐवज मिळण्यासाठी बँकेतच डिजिटल स्वाक्षरीमध्ये ७/१२, ८ अ, गाव नमुना नंबर ६ हे उतारे मिळण्याची सुविधा सुरू केली आहे.
ऊस तोडणी व वाहतूक कॅश क्रेडीट कर्ज मर्यादा सहा लाखावरून सात लाख इतकी केली.प्राथमिक विकास सेवा संस्था सक्षमीकरण योजनेअंतर्गत संस्थांना साडेपाच कोटींचे अनुदान वितरण.
दूध धंद्याला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांना व्यक्तिगत तसेच विकास व दूध संस्थांच्या सभासदांना राज्याबाहेरील म्हैस खरेदी करण्यासाठीही कर्जधोरण निश्चित करून पतपुरवठा केला जात आहे.
कर्मचाऱ्यांना विमासुरक्षा –
केडीसीसीच्या कर्मचाऱ्याचा दुर्दैवाने कोरोनाने मृत्यू झाल्यास २१ लाखांचा विमा, अपघाती मृत्यूसाठी २२ लाखांची विमासुरक्षा,इतर कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास १६ लाखांची विमासुरक्षा,तसेच; कर्मचाऱ्याचा कोरोनासह अन्य कोणत्याही कारणाने दुर्दैवी मृत्यू झाल्यास वारसाला अनुकंपा तत्त्वावर बँकेच्या सेवेत घेण्याचाही निर्णय.
गट सचिवानाही विमासुरक्षा –
कोल्हापूर जिल्हा देखरेख सहकारी संस्थेच्या आस्थापनेवर असलेले सबंध जिल्हाभरातील गटसचिवही बँकेच्या परिवाराचे सदस्य आहेत. सर्वच गटसचिवांना बँकेने ५ लाख रुपये वैद्यकीय विमा व ३० लाखांच्या जीवन विम्याची सुरक्षा योजना लागू केली आहे.बँकेकडे खातेदार असलेल्या नोकरदार पगारदारांना ३० लाख रुपयांची विमासुरक्षा
व्यक्तिगत कर्ज पुरवठामध्येही बँक सातत्याने आघाडीवर –
कोल्हापूर जिल्ह्याची दूध पंढरी अशी ओळख आहे. दूध धंद्याला आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी बँकेने १० लाखापर्यंत म्हैस खरेदीसाठी कर्ज देण्याचे धोरण स्वीकारले आहे. या कर्ज पुरवठ्याचा लाभ शेतकऱ्यांना आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, इतर मागासवर्गीय विकास महामंडळ, वसंतराव नाईक विकास महामंडळ, संत रोहिदास विकास महामंडळ योजनांमधून घेता येणार आहे.बहुजन समाजातील बेरोजगार युवक रोजगाराच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभा रहावा. यासाठी बँकेने आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आज अखेर ५०० लाभार्थ्यांना ५० कोटीहून अधिक कर्जवितरण केले आहे.
महिला विकासाला चालना –
महिला आर्थिक विकास महामंडळाशी झालेल्या सामंजस्य करारानुसार हातकणंगले – करवीर – पन्हाळा – शाहूवाडी – शिरोळ तालुक्यात २६७ गटांना ४ कोटींचे कर्ज मंजूर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत अपंग वयोवृद्ध, वेश्या व्यवसाय, मैला वाहतूक करणाऱ्या व्यक्ती, तृतीयपंथी व अपंगमित्र गट यासारख्या विशेष प्रवर्गाच्या गटांना कर्ज.तसेच कोल्हापुरी चप्पल, तिखट मसाला, विविध प्रकारचे पापड, मातीची भांडी, बांबू, क्राफ्ट, कापडी पिशवी तयार करणे, कुक्कुटपालन इत्यादी व्यवसायांचे तब्बल साडेसहा लाख महिलांना प्रशिक्षण.
बुबनाळच्या कृषी विज्ञान विकास मंडळाची सामंजस्य करार करून १४ गावात ४०० एलजी गट स्थापन करणार
बिगर शेती/ मार्केटिंग/ सीएमए सेल – सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून गडहिंग्लजच्या स्वराज्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला ५ कोटी रुपये मध्यम मुदत अर्थसहाय्य या हॉस्पिटलने कोविड सेंटर उभारणी करुन रुग्णसेवा केली.
कोविड बाधित कर्जदार संस्थाना हप्ते व व्याज यामध्ये सवलतीचा कालावधी देऊन नवसंजीवनी दिली.
साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीसाठी कर्जधोरण तयार केले.थकबाकीतील संस्थांच्या कर्जवसुलीला चालना मिळण्यासाठी रिझर्व बँक, नाबार्ड व शासनाच्या धोरणानुसार एकरकमी परतफेड योजना लागू केली.कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे दुष्परिणाम झालेल्या साखर उद्योगासाठी आत्मनिर्भर कर्ज योजना लागू केली.केडीसीसी बँकेने माहिती व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही उंचच- उंच गरुडभरारी घेतली आहे.
२०१९ मध्येच बँकेने स्वमालकीची कोअर बँकिंग प्रणाली कार्यान्वित केली आहे.जिल्ह्यात २४ तास कार्यरत १७ सीआरएम व ९ एटीएम मशीन सुरू आहेत.
बँकेने मोबाईल बँकिंग सुविधा सुरू केली –
रुपे डेबिट कार्ड द्वारे E-Com सुविधा यामधून फोन बिल, वीज बिल, पाणी बिल, शैक्षणिक फी, गॅस खरेदी व इतर तत्सम व्यवहारासाठी सुविधा उपलब्ध.
यु.पी.आय. सारख्या अत्याधुनिक सुविधेच्या माध्यमातून पेटीएम, गुगल पे, फोन पे, जिओ मनी, व्हाट्सअप यासारख्या सुविधा प्रदान.बँकेच्या खातेदारांचा प्रवास वेळ आणि पर्यायाने पैसा वाचवण्यासाठी बँकेची शाखा नसलेल्या व डोंगर कपारीतील वाड्या-वस्त्यांवर ५०० मायक्रो एटीएम कार्यरत.अपात्र कर्जमाफीचा विषय सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. लवकरच हा निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लागेल अशी अपेक्षा आहे.
नोटाबंदीचा विषयही सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे.
सभेला संचालक खासदार संजय मंडलिक, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजू आवळे, आमदार राजेश पाटील, माजी खासदार निवेदिता माने, पी. जी. शिंदे, विलास गाताडे, अनिल पाटील, भैय्या माने, सर्जेराव पाटील पेरिडकर, रणजितसिंह पाटील, श्रीमती उदयानी साळुंखे, अर्चना पाटील, तज्ज्ञ संचालक आर. के. पोवार, असिफ फरास , गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील, जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील उपस्थित होते.